Sunday 31 May 2015



वडार समाज. एक असा समाज, जो समाजातील इतर घटकांना ऊन, वारा, पाऊस यापासून वर्षानुवर्षे संरक्षण देण्याचे कार्य इमाने-इतबारे करत आहे. तेही विना तक्रार. गावगाड्याच्या व्यवस्थेत वडार समाजाकडे दगड घडवण्याचे व मानवाच्या मुलभूत गरजांपैकी एक गरज भागवण्याचे म्हणजेच निवारा बांधून देण्याचे कार्य आले. कोणतीही तक्रार न करता त्याने ते स्वीकारलेही. त्याच्या या व्यवसायात गडकोट, चिरेबंदी वाडे, मंदिरे यांच्या निर्मितीसह दगडखाणीतील दगड फोडण्याचे कार्यही तो पिढीजात व्यवसाय म्हणून करत आला आहे. आजही ती स्थिती कायम आहे. मुळातच शिक्षणाचे वातावरण न लाभल्याने त्यांची पुढची पिढीदेखील त्याच व्यवसायात राहिली.

आपल्या अंगमेहनतीने अशक्यप्राय वाटणारे डोंगरच्या डोंगर सहजपणे पोखरून काढणार्‍या या समाजाचे अंतरंग वडार समाजातीलच एक युवक जेव्हा समाजासमोर आणतो, तेव्हा संवेदनाहीन होत चाललेल्या समाजाच्या डोळ्यावरची झापडं सर्रर्र..दिशी बाजूला होतात. नव्हे नव्हे ती व्हायलाच हवी. डोंगर पोखरताना किंवा मोठमोठ्या इमल्या बांधताना अनेक वडार बांधवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याच्या गेलेल्या प्राणाचा मोबदला मात्र त्याला मिळतोच असे नाही. अर्थात प्राण ही अमूल्य गोष्ट असली तरीही त्याच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारवड गेलेला असतो. त्याचा किमान मोबदला आर्थिक स्वरूपात त्याच्या कुटुंंबीयांना मिळायलाच हवा, परंतु वास्तव काही वेगळेच असते. त्या आधारवडाच्या पश्‍चात कुटुंबीयांची इतकी वाताहत होते की, त्या वाताहतीच्या नुसत्या कल्पनेनेच आपण खचून नेस्तनाभूत होऊ.

‘दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ या सत्य घटनेवर आधारीत असलेल्या कादंबरीत वरील सर्व स्थित्यंतरं लेखकाने ताकतीने मांडली आहेत. हणमंत कुराडे या युवा कादंबरीकाराचे वय पंचविशीतले असले तरी त्याचे अनुभवविश्‍व आणि निरिक्षण शक्ती मात्र प्रगल्भ आहे. त्याने आपल्या कादंबरीत शब्दबध्द केलेल्या गोष्टी या केवळ कल्पनाविलास नसून सत्य घटनेवर आधारित आहेत. याशिवाय केवळ सत्य घटना आहे म्हणून त्या कादंबरीचे महत्त्व वाढते असे नाही तर, लेखकाने ज्या शैलीत आणि मोजक्या शब्दात आपल्या समाजाचे वास्तव मांडले आहे, त्यासाठी केवळ प्रतिभा ही एकच गोष्ट असावी लागते. ती कुराडे यांच्याकडे आहे.

 
वडार समाज हा आजही पिचलेल्या अवस्थेतच आहे. वडार समाजातील काही उच्चभ्रू लोकांनी आपल्या हिंमतीवर स्वत:चा विकास साधला आहे. त्यासाठी त्यांचे कौतुकच आहे, पण समाजाचे म्हणून   आपण काही तरी देणे लागतो ही भावना त्यांच्यामध्ये अजूनही रूजलेली नाही. मुळात हा समाज तसा पाहिला तर कमीच आहे. मात्र तरीही त्यांच्यासाठी म्हणून कष्ट घेण्यास कोणीही पुढे सरसावताना दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग दलित समाजासाठी केला. त्यात वावगे असे काहीच नाही. कारण त्या समाजाला वर आणण्यासाठी त्यातील नेमक्या उणिवा काय आहेत हे त्या समाजातील व्यक्तिच चांगल्या पद्धतीने जाणू शकतात. बाबासाहेबांना ही जाण होती, त्यामुळेच ते दलित समाजासाठी भरीव असे कार्य करू शकले. आजच्या घडीला मात्र तसा एकही दलित नेता डोळ्यासमोर नाही. वडार समाजाचीही तीच अवस्था आहे. कुराडे यांनी या कादंबरीच्या माध्यमातून ही वडार समाजातील सत्यस्थिती मांडली आहे. त्यांच्या लिखाणामुळे समाजातील इतर लोकांना यातील वास्तव माहिती होण्यास निश्‍चितच मदत होईल. वडार समाजात आजमितीला प्रचंड समस्या आहेत. यातील मुख्य म्हणजे शिक्षणाचा अभाव. मात्र प्रस्तुत कादंबरीतील नायक हा शिक्षणाच्या क्षेत्रात नेत्रदीपक अशी कामगिरी करताना पहायला मिळतो. लेखकाला त्याच्या समाजातील नेमक्या समस्या कळल्यानेच तो आपल्या नायकाला एक प्रेरणास्त्रोत बनवू इच्छितो. त्याचे हे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. लेखक आपल्या समाजातील समस्या कृतिशीलपणे सोडविण्यासाठी विविध संघटनांमध्ये कार्यरतही आहे.

या कादंबरीला प्रस्तावना लाभली आहे ती, अमर कुसाळकर या हरहुन्नरी माणसाची. अतिशय मार्मिक शब्दात लिहिलेली प्रस्तावना ही या कादंबरीला आणखी बळ देऊन जाते. कादंबरीतील एक प्रकरण तर खूपच ताकतीचे झाले आहे. अगदी मोठमोठ्या लेखकांची सुट्टी करेल असे ते प्रकरण आहे. कादंबरीचा नायक गोपू हा वसतीगृहात रहायला जातो. त्यावेळी त्याच्या मित्रासह त्याला स्पेशल जेवणाचा बेत करायचा असतो. मात्र तो बेत करताना नायकासह त्याच्या मित्रांचे जे हाल आणि गमती-जमती होतात; ते लेखकाने कादंबरीत इतक्या ताकतीने मांडले आहेत की, शालेय अभ्यासक्रमात त्याची निवड झाल्यास वावगे ठरू नये. हे प्रकरण वाचल्यानंतर आमच्या शालेय जीवनातील मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘विजेचा दिवा’ धड्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

लेखकाने, वडार समाज नक्की कसा आहे? त्याची संस्कृती काय आहे? त्याच्या समस्या, त्याची बलस्थानं आणि कमकुवतपणा कशात आहे, या सर्वाचे एक विलक्षण दर्शन ‘दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ या कादंबरीतून मांडले आहे. त्यामुळे वडार समाजातील बांधवांसह इतर लोकांनीही ती आवर्जून वाचायलाच हवी. ‘चपराक प्रकाशन’सारख्या संस्थेचे त्यासाठी आभारच मानायला हवे कारण अशा विषयांवरची पुस्तके प्रकाशित करून समाजातील आपली जबाबदारी किती महत्त्वाची आहे याचे दर्शन ते घडवतात. विशिष्ठ जातीचे ते पुस्तक आहे, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता, त्यातील वास्तव समाजासमोर आणण्याचे धाडस ते दाखवतात. युवा कादंबरीकार हणमंत कुराडे याचे हे पहिलेच पुस्तक आहे, मात्र एखाद्या कसलेल्या कादंबरीकाराप्रमाणे त्याची लेखणी चालते. इथे मुद्दामहून कोणत्याही कादंबरीकाराशी कुराडेंची तुलना करत नाही, कारण दोन प्रतिभावान व्यक्तींची तुलना कधीच करता येत नाही. त्यांच्या भावी लेखन कार्यास शुभेच्छा..!

दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य
लेखक : हणमंत कुराडे
प्रकाशक : 'चपराक प्रकाशन', पुणे
पुस्तकासाठी संपर्क : ७०५७२९२०९२ / ०२०-२४४६०९०९
पृष्ठ संख्या : ८०   मूल्य : ७५ रू. 

सागर सुरवसे
9769179823

Follow on twitter: @sagarsurawase  

(लेखाची पूर्व प्रसिद्धी- साप्ताहिक 'चपराक', पुणे - २५ मे २०१५ )


0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!