Saturday 6 June 2015



पुण्याहून मुंबईला निघालो होतो. सकाळचे 7 वाजले होते. एक नंबर फलाटावर डेक्कन क्वीन लागली होती. लगबगीन बोगी नंबर 5 जवळ गेलो मात्र बोगी फूल झाली होती. 6, 7 नंबरमध्येही तीच स्थिती. त्यामुळे 8 नंबर बोगीमध्ये शिरलो. ही बोगी ब-यापैकी मोकळी होती. अर्थात ही मोकळीक पाहूनच मनात शंकेची पाल चुकचुकली. डब्यात प्रवेश करताच अनेकांच्या तिरस्कारयुक्त नजरा माझ्याकडे  रोखल्या गेल्या. 'आली आणखी एक ब्याद' असेच काहींचे चेहरे झाले. हे सर्व पाहिल्यावर आपण कोणत्यातरी स्पेशल डब्यात शिरल्याचे जाणवले. घडलंही तसंच होतं. कारण मी ज्या डब्यात प्रवेशलो होतो तो रोज पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणा-या चाकरमान्यांचा होता. अर्थात ते सर्व चाकरमाने त्या डब्याला आपली जहागीर मानतात आणि स्वत:ला त्यातील युवराज!
डब्यात चढून माझी बॅग लगेज स्टॅंडवर ठेवतो तोच एकाने हटकले, "तुमची बॅग तिकडे ठेवा".
मी लगेच प्रतिप्रश्न केला, "का? जागा विकत घेतलीय का?"
"अरे तुला नीट सांगतोय ना; ऐक की," तो उत्तरला.
मी म्हटलं'"कारण सांगा?"
त्यावर तो शांत झाला.
स्पेशल डब्यात चढल्याबद्दलचा हा दुसरा उघड विरोध होता. आपल्या अधिकाराची जाणीव असल्याने डगमगलो नाही. थोड्याच वेळात जी सीट रिकामी होती तेथे बसणार तितक्यात एकाने विरोध सुरू केला... "येथे बसायचे नाही. ही पासधारकाची जागा आहे. पुढच्या डब्यात चालायला लागायचं."
तो ज्या आवेशाने बोलला त्याच्याहून अधिक आवेशपूर्ण आवाजात बोललो, "रेल्वे काय बापाची आहे का? की खरेदी केलीय? व्हय रे भडव्या. औकादीत राहा. तू कोण मला सांगणारा?...सरक तिकडे."
माझ्या या बोलण्याने तो जाग्यावरून उठला. "शिव्या देतो काय" म्हणत अंगावर आला. तोच मी पण बाह्या सरसावल्या आणि अंगावर गेलो. तोच आजूबाजूच्या प्रवाशांनी मध्यस्ती करत भांडण सोडवले. त्यानंतर तेथील सर्वांनी मला उपदेशाचे डोस आणि नैतिकतेचे धडे द्यायला सुरूवात केली.
सर्वांकडे दुर्लक्ष करत चेह-यावर माजूरडेपणाचा भाव आणत मी सीटवर बिनदिक्कतपणे बसलो. त्यानंतर मला कोणी विरोध केला नाही. तोवर सर्व ठीक होते. पुढच्या काही मिनिटातच यांच्या मुजोरवृत्तीने जोर पकडला. ज्या प्रवाशांनी तिकिट काढले होते त्यांना ते डब्यात प्रवेश नाकारू लागले. जे पासधारक नव्हते त्यांना या टोळक्याने अक्षरश: धक्के देऊन पुढच्या डब्यात पिटाळले. यांची मुजोरी एवढ्यावर न थांबता त्यांनी दोन बोगीमधील शटर बंद करून घेतले. वास्तविक पाहता पासधारक हेदेखील प्रवाशीच असतात. त्यांना हा अधिकार दिला कोणी? हे काम टिसीचे आहे. मात्र या लोकांचे संघटन इतके असते की हे सहजपणे एकाद्याला बाहेर काढतात. रेल्वे प्रशासन नावाचे बांडगूळ मात्र यावर काहीच भूमीका घेत नाही. ही मुजोरी थांवलीच पाहिजे.
गाडी सुटायला काही मिनिट असताना दोन पासधारक गाडीत चढले. आश्चर्य म्हणजे या पासधारकांनादेखील या कंपूने बसायला विरोध केला. आमच्याकडे जागा नाही. आमचा माणूस येणार आहे. त्यातील एकाने मात्र विरोध करत ठाण मांडली. अन्यायाची मनस्वी चीड असल्याने या लोकांचा प्रचंड संताप आला होता. हाताच्या मुठी पिळल्या होत्या. माझी ही स्थिती दादरला पोहोचेपर्यंत तशीच होती.
विशेष म्हणजे शिवाजीनगर स्टेशन पार करायच्या आतच या कंपूने पत्त्याचा डाव मांडला आणि जुगार सुरू केला. तो शेवटपर्यंत सुरू होता. हा सर्व प्रकार पाहून वाटले, 'ही तर जात पंचायतच आहे.' दादरला उतरल्यानंतर रेल्वेतील सर्व प्रकार 1 नंबर फलाटावरील जनरल मॅनेजरच्या कानावर घातला. मात्र नेहमीप्रमाणे आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. अशा प्रकारांना केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू आणि त्यांचे रेल्वे प्रशासन कसा आळा घालणार हा यक्ष प्रश्न आहे. रेल्वेतील पासधारकांची मुजोरी थांबलीच पाहिजे.


0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!