Monday 23 February 2015



’संयम बाळगतो म्हणजे गांडुची औलाद समजू नका. याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. लाल सलाम!’ गोविंदराव पानसरे यांच्या मृत्युची बातमी आल्यानंतर माझ्या एका जबाबदार पत्रकारमित्राची ही पहिली प्रतिक्रिया. गोविंदरावांची हत्या कुणी केली याचा तपास भविष्यात लागेल. मात्र, गोविंदरावांच्या विचारांची, तत्त्वांची हत्या करणारा मात्र माझा मित्रच निघाला. तसा तो एकटाच आहे असे म्हणायचे कारण नाही. त्यासारखे शेकडो तथाकथित पुरोगामी कार्यकर्ते राज्यभरात आहेत. काही तर संपादक, वकील, उद्योजक व लेखकसुद्धा आहेत.

याशिवाय माझे आणखी काही पुरोगामी मित्र आहेत. त्यांच्याही प्रतिक्रिया इथे सांगणे क्रमप्राप्त ठरते.
- ’हरामखोरांनो, गोळ्या घालून विचार संपत नसतो, हे गांधी हत्येनंतरही तुमच्या लक्षात आले नाही. गांधी, दाभोलकर आणि आता पानसरे सरांची हत्या. आम्ही या विचारांचे सच्चे वारसदार आहोत. तुमच्या गोळ्यांना भीक घालत नाहीत. ही लढाई आम्ही अर्धी सोडणार नाही, कॉम्रेड!’

- ’खरा शिवाजी घराघरांत पोहचवणे गरजेचे आणि नथुरामाच्या अवलादींशी लढा देणे हाच एकमेव पर्याय!’
- ’ज्या धर्मासाठी किंवा धर्माच्या नावाखाली 82 वर्षांच्या व्यक्तिची हत्या होते, व्यक्त होण्याचा सोडा जगण्याचाच हक्क, अधिकार हिरावला जातो, तो धर्म सहनशील कसा असू शकतो? अशा धर्माचा त्याग केलाच पाहिजे.’

वरील उपटसुंभांच्या प्रतिक्रियांचा सूर असा आहे की, ही हत्या हिंदुत्त्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रत्यक्षात मात्र याबाबत कोणताही पुरावा किंवा सुगावा कुणाकडेच नाही. वरील आरोपांमुळे डॉ. दाभोलकरांची हत्या कुणी केली हे कळत नाही, परंतु त्यांच्या विचारांची हत्या करणारे मात्र त्यांचे तथाकथीत अनुयायीच आहेत. कारण, डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा त्यागण्याचा अट्टाहास धरला होता. त्यांनी अनेकांचा भोंदूपणादेखील पुराव्यानिशी उघड करून दाखवला होता. मात्र, आज त्यांचेच अनुयायी म्हणवून घेणारे उपटसुंभ कोणत्याही पुराव्याअभावी दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या हिंदुत्त्ववादी संघटनेतील लोकांनी केली, अशी अंधश्रद्धा बाळगून आहेत. महापुरूषांचा किंवा विचारपुरूषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात हे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

याठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे, गांधींनंतर दाभोलकर, पानसरे यांचा क्रम लावणे. वस्तुस्थिती पाहिली तर, महात्मा गांधी हे देवाला मानत होते; दाभोलकर, पानसरे मात्र ते मानत नव्हते. त्यामुळे त्यांची हत्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी केली असे म्हणणे विरोधाभासाचे ठरते. 1999 च्या एनडीए सरकारची आघाडी ही कॉमन मिनीमम प्रोग्रॅमवर आधारित होती. त्याप्रमाणे केवळ अहिंसा या कॉमन मिनीमम विचारांवर गांधी-दाभोलकर-पानसरे यांचा वारसा आहे. राहता राहिला प्रश्‍न गांधी हत्येचा. नथुराम गोडसेने बापूंना मारले ते शेकडो कार्यकर्त्यांसमोर. मात्र दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणारे मारेकरी अज्ञात आहेत. त्यांनी असा कोणताही पुरावा सोडलेला नाही की आम्ही अमुक अमुक एका विचाराचे आहोत. त्यामुळे दाभोलकर किंवा पानसरे यांची हत्या हिंदुत्वावाद्यांनी केली हा एक जावईशोध म्हणावा लागेल.  
हत्या कोणाचीही असो, तिचे समर्थन कदापिही करता येत नाही! मात्र, कोणत्याही सबळ पुराव्याअभावी एखाद्यावर आरोप करणेदेखील गैर आहे. 

याशिवाय आणखी एक प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया तर दाभोलकरांना संकुचित करणारी, त्यांना देवत्व बहाल करणारी ठरते,  ती अशी... 
’सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला. आज रात्री (20 फेब्रुवारी) त्यांचे निधन झाले आहे. दीड वर्षापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळ्या घालून मारण्यात आले. अजून त्यांचे मारेकरी सापडले नाहीत तोच पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि आता त्यांचे निधन झाले. का मारले या दोघांना? तर ते लोकांना शहाणे करत होते. त्यामुळे हितसंबंधित लोकांनी त्यांची हत्या केली. गांधी मारले, दाभोलकर मारले आणि आता अण्णा. अजून अनेकजण लिस्टवर आहेत. आमचाही कधी नंबर आहे. यात विशेष काही नाही, पण मानवतेच्या शोषणमुक्तीचा लढा आम्ही असाच चालू ठेवू हीच या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’

यावर मी त्या जबाबदार अनुयायी पत्रकार मित्राला सांगितले, ’मित्रा, माझ्या माहितीप्रमाणे डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या मारेकर्‍यांचा अजून तपास लागलेला नाही.’

त्यावर तो म्हणाला, ’आमचा माणूस मारला तरी अजून तुम्हाला काय म्हणायचे आहे?’

मी म्हणालो, ’दाभोलकर, पानसरे हे सर्व समाजाचे होते. त्यांच्यावर कोणीही हक्क प्रस्थापित करू शकत नाही मित्रा.’

तो म्हणाला, ’पुरोगामी म्हणजे आम्ही! या अर्थाने ती आमची माणसे आहेत. एवढे तुला निश्‍चित समजत असेल, असे मला वाटले होते. असो आता ही चर्चा करण्याची वेळ नाही, पण...’

पुढे संवाद संपला, मात्र वरील संवादातून लक्षात येईल की, डॉ. दाभोलकर, पानसरे यांना त्यांच्या अनुयायांनी किती संकुचित केले आहे. याउलट माझे दुसरे मित्र हर्षल लोहकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गेल्या पाच दिवसापासून पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदीराजवळील पुलावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे उपोषणकर्ते मित्र खर्‍याअर्थी दाभोलकर, पानसरे यांच्या विचारांचा वारसा पुढे रेटत आहेत. त्यांच्या कार्यास शुभेच्छा आहेत.

दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणारे कोण आहेत? ते कोणत्या संघटनेचे, विचारांचे आहेत? ते अद्याप मला माहीत नाहीत, पण त्यांच्या विचारांचे मारेकरी त्यांचे हे प्रतिक्रियावादी अनुयायीच आहेत हे मात्र नक्की.

सागर सुरवसे, पुणे
9769179823

Follow On Twitter- @sagarsurawase 

0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!