Tuesday 17 February 2015



 दिल्लीच्या अभूतपूर्व निकालानंतर मोदींची लाट ओसरली असे अनेक अराजकीय विश्‍लेषक सांगत सुटले आहेत. गंमत म्हणजे लोकसभेच्या विजयानंतर हेच विश्‍लेषक मोदींची लाट आहे हे मानायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांचे विश्‍लेषण कोणत्या प्रतीचे आहे हे लक्षात येते. लेखाचा मूळ विषय आहे मोदींचा बारामती दौरा. विधानसभेच्या प्रचारावेळी मोदींनी बारामतीकरांना आवाहन केले होते की, ’’पवार काका-पुतण्याचे साम्राज्य खालसा करा. बारामतीला गुलामीतून मुक्त करा.’’ मात्र अजून विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच मोदींनी त्याच साम्राज्याचे कौतुक सुरू केले आहे. त्यानंतर समाज माध्यमातून (सोशल मीडियावरून) मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली. मात्र असं असलं तरी मोदींनी पवारांच्या केलेल्या कौतुकाकडे अनेक अंगांनी पाहावे लागेल.
गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपमधील वाक्युद्ध चांगलेच रंगले आहे. त्यामुळे सेना-भाजपमध्ये फारसं काही अलबेल नाही हे लक्षात येतं. सेनेलाही ते अलबेल रहावे असं वाटत नाही, कारण लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. भाजपसोबत महापालिका निवडणुका लढलो तर आपल्याला त्याचा फटका बसणार या असुरक्षिततेतून सेनेची ही खेचाखेची सुरू आहे. तीच गोष्ट भाजपच्या बाबतीत आहे. सेनेवरील आपला लगाम शाबूत ठेवण्यासाठी भाजपला आणखी एका पक्षाची गरज आहेच. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीशी आपला घरोबा राखला आहे. 
याशिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मदतीने सेनेची मुंबईतील रसद बंद करण्याचा भाजपच्या चाणक्यांचा विचार दिसत आहे. त्यासाठीच हा घरोबा मोदी करत आहेत. विधानसभेचा इतिहास पाहाता ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व परिप्रेक्षेतून पंतप्रधानांच्या बारामती दौर्‍याकडे पाहिले तर अनेक गोष्टी लक्षात येतात.
मोदींनी बारामती दौर्‍यात पवारांची स्तुती केल्याच्या बातम्या सर्वच माध्यमातून झळकल्या. समाज माध्यमातून तर मोदींवर फारच टीकेची झोड उठवली गेली. ही टीका होणे साहजिक आहे कारण, विधानसभेवेळी मोदींनी राष्ट्रवादीला ’नॅशनल करप्ट पार्टी’ असे संबोधले होते. सत्तेत येताच मोदींनी याच करप्ट पार्टीच्या प्रमुखांवर स्तुती सुमने उधळली. बारामती दौर्‍यात मोदी म्हणाले, ’’ जिथे मती आणि गती असेल तिथे प्रगती असते. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्वाचे मानतो. पक्षापेक्षा देश मोठा आहे.  आमचे मार्ग वेगळे असले तरी विकास हेच आमचे लक्ष्य आहे. सरकार कसं चालवायचं? राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय कसा ठेवायचा? या बाबतीत मी पवारांकडून धडे घेत आलो आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना शरद पवार हेच माझे एकमेव दुवा होते. महिन्यातून दोन-तीनवेळा आमचं बोलणं व्हायचं. केंद्रात असताना त्यांनी गुजरातचे अनेक प्रश्‍न सोडवले आहेत.’’ 
मात्र असं असली तरी, ''गेल्या दहा वर्षात जे काम झालं नाही ते काम करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचा'' चिमटाही त्यांनी पवारांना काढला. मोदी पुढे म्हणाले, ’’वाद आणि संवाद हे लोकशाहीचे सौंदर्य आहेत.’’ या सर्व स्तुती सुमनांवरून मोदी राजकारणात वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे, केजरीवाल यांच्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही मोदींनी खुल्या मनाने ट्विटरवरून केजरीवालांचे अभिनंदन केेले. त्यांना भेटीचे आमंत्रण देऊन त्यांची भेट घेतली. मात्र असं असलं तरी भारतीय समाज आजही राजकारणाच्या बाबतीत या गोष्टी मान्य करायला तयार नाही. खरं तर भारतीय समाजासाठी ही एक संधी आहे, राजकारणात समन्वय येऊ देण्याची. कारण जोवर राजकीय नेत्यांमध्ये विकासाच्या बाबतीत एकवाक्यता होत नाही, तोवर देशाचा विकास शक्य नाही. मोदींचे हे राष्ट्रप्रेम, समन्वयाचे राजकारण केवळ मुंबई महापालिका जिंकण्यापूरतं मर्यादीत राहू नये हीच अपेक्षा. अन्यथा लोक म्हणतील, पवारांची मती, मीडियाची गती आणि मोदींची अधोगती...  
(प्रसिद्धी-  सा. चपराक)

सागर सुरवसे
9769179823/ 9665899823
Follow- @sagarsurawase
Email- sagar.suravase@gmail.com

0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!