Friday 18 January 2013

                    क्रिकेट विश्वातील महात्मा !              
महानगरातील सच्चू ! शहरातील तेंडल्या तर ग्रामीण भागातील सच्या हा नामजप गेली तेवीस वर्षे क्रिकेट क्षेत्रात चर्चेच्या अग्रस्थानी राहिलेला आहे. देशातच नव्हे तर परदेशातही त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कदचित महात्मा गांधी यांच्यानंतर परदेशी लोकांचे प्रेम मिळविणारा हा एकमेव भारतीय, एकमेव खेळाडू असेल !
'स्व'विचार न केल्याने पूर्वी भारताने आपले स्वातंत्र्य गमावले होते. आजही तो विचार  'न' जपल्यामुळे आपण आपली चांगली माणसेही गमावतो आहोत. कणभर लोकांचे विचार मणभर माणसे ऐकतात  व तेच अंतिम  सत्य मानतात.  ही वैचारिक  अंधश्रद्धेची मूळ वेळीच उपटून काढली पाहिजे. एकविसाव्या युगातील भारतीयांकडून ही परंपरा पाळली जात आहे, याचेच शल्य वाटते !
  
कोणत्याही टिकेने, कृतिने आपला खेलावरचा संयम न सोडता आपली भूमिका तटस्थपणे  निभावणारा व त्यायोगे विरोधकांना कृतिपूर्ण उत्तर देणारा हा क्रिकेट विश्वातील महात्मा गांधीच ठरतो. 
१९८९ मध्ये सोळा वर्षाच्या या मुंबईतील मराठी युवकाने  अथक परिश्रमाने आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये खेळण्यास स्वतःला पात्र केले. तेवीस वर्षात ४६३ सामने खेळून १८४२६ धावा करणारा क्रिकेट जगतातील कदाचित तो एकमेव खेळाडू ठरावा. 
गेल्या दीड वर्षापासून सचिनच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केली जाऊ लागली. ( अर्थात ती जाणीवपूर्वक ) एखाद्या मुर्खाने , अनुभवशून्य व्यक्तिने ती केली असती तर समजण्यासारखे होते. मात्र सुनील गावसकर कपिल देव आदी दिग्गजांनीही शंका त्याच्या क्षमतेवर शंका उपस्थित करणे दुर्दैवी होते. ' मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो ' हे दुर्दैवाने  पुन्हा एकदा  सिद्ध झाले. हे बदनामीचे, खच्चीकरणाचे जाळे विनायचे काम कोणी केले हा विषय वेगळा; मात्र तेंडल्याच्या बाबतीत सामान्य जनतेने, त्याच्या चाहत्यांनी या टीकेला, फुकटच्या सल्ल्याला योग्य मानून सचिनवर आगपाखड केली व आपला करंटेपणा पुन्हा एकदा दाखवून दिला. 
भारतीय जनता किती दुधखुळी आहे याची उदाहरणे ऐकली होती. आता लक्षात येत आहे . सचिनने एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती का घेतली ?  यावर वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. काय तर म्हणे पाकिस्थानच्या खेळाडूंना घाबरून त्याने निवृत्ती घेतली. काही महाभाग म्हणताहेत की, दिल्लीतील बलात्काराच्या प्रकरणावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी त्याला कॉंग्रेसने  राजीनामा द्यायला लावला. इतकी वैचारिक अंधश्रद्धा आजही आपल्या देशात आहे. ( काय तर म्हणे २०२० ला भारत महासत्ता होणार ! )
दरम्यान भारतीय माध्यमांनीदेखील सचिनच्या बाजूने ठामपणे भूमिका घेतली नाही. चार - पाच वर्षे क्रिकेट खेळलेल्या उपटसुम्भाने  केलेल्या टिपण्णीलाही माध्यमांनी सवंगपणे प्रसिद्धी दिली. मुळात अशा प्रकारच्या जागतिक कीर्तीच्या खेळाडू, साहित्यिक, कलावंत यांच्याबाबत अशा किरकोळ टीकेला कितपत प्रसिद्धी द्यावी याचा विचार होणे गरजेचे आहे . 
सचिनने भारताचे नाव क्रिकेट विश्वात जगभरात आघाडीवर आणले.' क्रिकेट विश्वातील कोहिनूर हिरा ', ''क्रिकेटचा देव' 'बादशहा', 'शहेनशहा' आदी उपाद्या  साऱ्या जगाने त्याला दिल्या. सचिनच्या यशाची धास्ती घेतलेल्या लोकांनी सचिनला टारगेट केले. ते नैसर्गिकच  होते. 
पूर्वी क्रिकेटच्या सामन्यात एखादा स्ट्रोक, एखादा  पंच मारल्यानंतर संपूर्ण हाताला मुंग्या येत. हातातून ब्याट केव्हा खाली पडेल याची शाश्वती नसायची. मात्र तरीही निकृष्ठ दर्ज्याच्या ब्याटद्वारे त्याने आपली क्रिकेटची वाटचाल सुरु केली. नुसती सुरूच नव्हे तर नेत्रदीपकही बनवली. कदाचित त्यामुळेच त्याला खांद्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. 
 हत्तीसारखे बलाढ्य खेळाडू समोर गोलंदाजी करत असतानादेखील त्याने संघातील आपले स्थान टिकवून ठेवले. ज्या देशाने आपल्या राष्ट्रावर १५० वर्षे राज्य केले , त्यांनीच निर्माण केलेल्या खेळावर सचिनने गेली २३ वर्षे अधिराज्य गाजवले. त्याचे हे योगदान भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे होते. भारत हि बुद्धिवंतांची भूमी आहे. त्याचप्रमाणे आज- काल ती मुर्खांचीही भूमी ठरत आहे. 'स्व'विचार न केल्याने पूर्वी भारताने आपले स्वातंत्र्य गमावले होते. आजही तो विचार  'न' जपल्यामुळे आपण आपली चांगली माणसेही गमावतो आहोत. कणभर लोकांचे विचार मणभर माणसे ऐकतात  व तेच अंतिम सत्य मानतात. ही वैचारिक अंधश्रद्धेची मूळ वेळीच उपटून काढली पाहिजे. एकविसाव्या युगातील भारतीयांकडून ही परंपरा पाळली जात आहे, याचेच शल्य वाटते !  
                                                           ( प्रकाशित लेख - साप्ताहिक 'चपराक', दि. ३१ डिसेंबर २०१२ )   
                                                       सागर सुरवसे, पुणे. 
                                 भ्रमणध्वनी - ९६ ६५ ८९९ ८२३ email : vijaypath150@gmail .com  
Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!