Thursday 14 May 2015

संभाजी हा शिवाजी महाराजांचा लाडात वाढलेला, रायगडावर तरूणपणी टगेपणा करणारा, थोरातांची कमळा, तुलसी, गोदावरी आदी पोरींना नादी लावणारा, दारू पिणारा, शिवरायांना सोडून मोगलांना मिळणारा, महाराजांनी मोठ्या मिनतवारीने परत आणलेला, अखेर पन्हाळगडावर तुरूंगात ठेवलेला, महाराजांच्या मृत्युनंतर संतापून तुरूंगाचे गज तोडून रायगडावर आलेला जणू वेताळ. राजारामाला तुरूंगात टाकणारा, राजारामाची आई  सोयराबाईंना भिंतीत गाडून मारणारा, औरंगजेबाच्या हाती गाफीलपणामुळे लागलेला, त्याने ‘मुसलमान’ हो म्हटल्यावर ‘तुझी मुलगी देत असशील तर मुसलमान होतो’, असे बाणेदार उत्तर देणारा आणि शेवटी हालहाल करून करून (औरंगाजेबाकडून) मारला गेलेला असा उग्र प्रकृती, अविचारी, व्याभिचारी, शिवरायांचे राज्य बुडविणारा संभाजी असा, खोटा इतिहास  काही जातीयवादी इतिहासकांकडून रचण्यात आला. परंतु वस्तूस्थिती काही वेगळीच होती.  
संभाजी महाराजांचे जे दुर्गुण रंगविण्यात आले ते मुळी त्यांच्या वृत्तीत नव्हतेच. जे सद्गुण होते ते सांगण्यात आलेच नाहीत. ते वीर होते त्यांना प्रेमवीर बनवले, ते संस्कृत भाषेत निष्णात होते. हिंदी व संस्कृत भाषेत त्यांचे चार काव्यग्रंथ आहेत. वयाच्या 9 व्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेत असतानाच वयाच्या 14 व्या वर्षी राजनीतीवरील ‘बुधभुषणम्’ हा संस्कृत भाषेतला ग्रंथ त्यांनी लिहिला. औरंगजेबाचा पुत्र मोअज्जम याच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्षे मनसबदार म्हणून पाठविले. 11व्या व 12व्या राजगडावरील सदरेवरून ते राज्यकारभारात लक्ष घालू लागले. वयाच्या 17 व्या वर्षी रायगडावर त्यांना युवराज म्हणून घोषित करण्यात आले. 19 व्या वर्षी पन्हाळा, श्रृंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले होते. मात्र हा सर्व इतिहास झाकून ठेवण्यात आला.                                           
शंभूराजांच्या पराक्रमाविषयीचा थोडासा आढावा घेऊयात. त्यांच्या पराक्रमाविषयीचा इतिहास सांगण्याचा मोह सार्‍या महाराष्ट्राला झाल्याशिवाय राहणार नाही. संभाजीराजांच्या पराक्रमाविषयी शाहीर योगेश म्हणतात,

देश धरम पर मिटने वाला
शेर शिवा का छावा था
महापराक्रमी परम प्रतापी
एकही शंभु राजा था..!


छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द
शंभूराजांच्या प्रखर कारकिर्दीचा काळ होता तो 8 वर्षे आणि 8 महिने. एकाचवेळी अनेक शंत्रुंशी झुंज देणारा, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि मोगल हे चार शत्रू. त्यातही अवघे मराठी स्वराज्य बेचिराख करण्याच्या हेतुनिशी प्रतिज्ञा करून महाराष्ट्रात जातीनिशी (सात लाख फौजेनिशी) उतरलेला क्रूरकर्मा औरंगाजेब! शंभुराजांनी या अल्पकाळात एकही लढाई न हरता सुमारे सव्वाशे लढाया जिंकल्या. सात लाख फौजेशी आपल्या पंचवीस हजारांच्या बेताच्या सैन्याच्या सामर्थ्यानिशी उणीपुरी 9 वर्षे झुंज दिली. हा जगाच्या इतिहासातील अभूतपूर्व पराक्रम. असा ज्वलज्वलंत संभाजीराजा न भूतो, न भविष्यती...


वर्ष तीनसे बीत गये अब
शंभु के बलिदान को
कौन जीता कौन हारा
पुछ लो संसार को !


महाराजांची युद्धनीती
शंभुराजे आपल्या युद्धनीतीमध्ये शत्रूपक्षाचा जास्तीत जास्त विध्वंस करणे, रसद तोडणे, पाण्यात वीष कालवून शत्रूसेनेची हानी करणे आणि अनेक सेना एकाचवेळी अनेक ठिकाणी लढवणे या युद्ध तंत्राचा वापर करत, आपले सैन्य मोगलांच्या मानाने खूपच कमी हे लक्षात घेऊन त्यांनी ‘खच्चीकरणाची युद्धनीती’ अवलंबिली. शक्य तेथे आक्रमण व शक्य तेथे बचाव असे दुहेरी सूत्र त्यांनी वापरले. शत्रूची युद्धनीती (योजना) ओळखून त्या उधळून लावणे. त्यांती रसद व दळणवळण तोडून टाकणे आणि त्यांची उपस्थिती खिळखिळी करणे हा सुद्धा त्यांच्या युद्धनीतीचा भाग. जेव्हा मोगलांनी नाशिकजवळच्या अहिवंत गडावर हल्ला केला, तेव्हाच बर्‍हाणपूर व सुरत येथे हल्ले चढवून मराठी सेनेने त्यांना जर्जर केले. म्हणजे आपण विचार केला तर असे लक्षात येते की, शत्रूने एका भागावर हल्ला केला असता त्यांच्या दुसर्‍या भागावर हल्ला चढवणे आणि शत्रूचे चित्त विचलीत करून सोडणे.



 
दक्षिणेत सत्ता
1682 साली संभाजी महाराज वीस हजारांचे घोडदळ घेऊन म्हैसूरच्या दिशेने निघाले तेव्हा त्यांचे वय होते अवघे 25 वर्षे. सातारा, मिरज, हुबळी, धारवाडमार्गे चिकमंगळूरच्या ठाण्यावर जाऊन त्यांनी ताबा मिळवला. पुढे चिक्कदेवरायांशी लढाई करून चित्रदूर्ग येथेच आपला दक्षिणेतील सैनिकी तळ निर्माण केला. तेथून ते आपल्या सेनेसह मदुराईकडे रवाना झाले. चित्रदुर्गाहून टुमकूर, चिक्कबाळापूर, धर्मपुरी या मार्गाने त्रिचनापल्लीपर्यंत जाऊन त्यांनी त्याचा ताबा घेतला. नंतर मद्रासच्या दक्षिणेस (म्हणजे आत्ताचे चेन्नई) आपला अधिकार प्रस्थापित केला. औरंगजेबाला यश न मिळाल्याने तो आपल्याच सेनानींवर संशय घेऊ लागला. त्याने शहजादा मोअज्जम आणि दिलेरखान यांनी औरंगाबादेस बोलून घेतले. दिलेरखानाला कैद व शहजाद्याला नजरकैदेत ठेवले. अखेर बादशहाने पुन्हा त्यांना चांगलीच तंबी देऊन व त्याची समजूत घालून त्याला पुन्हा युद्धावर धाडला. दिलेरखानाने मात्र घोर नैराश्याने 20 सप्टेंबर 1683 रोजी आत्महत्या केली.
आता 1683-84 साली संभाजी महाराज गोव्याकडे वळाले. गोव्यातील फोंडा किल्ला त्यांनी सहज सर केला. राजा विजरेई कौंट द आल्व्हारो हा अपयश घेऊन 11 नोव्हेंबर 1683 ला मागारी फिरला. विजरेईला वाटले फोंडा प्रकरण झाल्यावर संभाजीराजे रायगडला परततील. परंतु शंभुराजे उलट अधिकच गोव्याच्या पोटात शिरू लागले. युद्धनिधीस मदत करण्यासाठी विजरेईने 24 नोव्हेंबर 1683 ला गोव्याच्या किल्ल्यावरील एका सभागृहात सभा बोलावली. त्याच दिवशी संभाजी महाराज आपल्या फौजेनिशी स्टीफन म्हणजेच जुवे बेटात उतरले. ते त्यांनी सहज सर केले. हे वृत्त कळताच विजरेई आल्व्हारो मोठी सेना घेऊन जुवे बेट जिंकण्यासाठी धावून आला. मात्र आतून व बाहेरून विजरेईवर जबरदस्त हल्ला झाला. विजरेई गोळी लागूनही गोव्यातून कसाबसा पळाला. त्याचा घोडा मात्र मराठ्यांच्या हाती लागला. ही शोकांतिका बघण्यासाठी खाडीच्या दोन्ही तिरावर गावकरी लोक जमले होते. शंभुराजे इतके बेभानपणे विजरेईचा पाठलाग करत होते की, त्याच्या मागे त्यांनी आपला घोडा नदीत घातला. संभाजी महाराजांच्या हल्ल्याने घाबरलेला विजरेई इतका गर्भगळीत झाला की, त्याने गोव्याच्या चर्चमधील सेंट झेवियरचे शव बाहेर काढून त्यांची प्रार्थना केली. एका कागदावर गोव्याचे सारे राज्य झेवियरला अर्पण केल्याचे त्याने लिहून दिले आणि त्याने गोव्याचे रक्षण करावे असे साकडे घातले.

चारित्र्यहीन धर्मगुरूंची धिंड  
संभाजीराजांनी गोव्यातील किल्ल्यावरच्या पाद्री लोकांचे झगे काढून घेऊन, हात मागे बांधून त्यांची गावातून धिंड काढली. ज्या धर्मगुरूंची राजांनी धिंड काढली त्यांच्यापाशी धर्म नव्हता आणि गुरूंचे चारित्र्यदेखील नव्हते. शंभुराजांचे पोर्तुगीजांशी युद्ध जितके राजकीय होते तितकेच धार्मिकही होते. या पाद्री लोकांनी हिंदुंना बाटवण्याचे, जे बाटण्यास तयार नाही त्यांना जिवंत मारण्याचा आणि पैसा उकळण्याचा सपाटा लावला होता.

बादशहा वैतागला
संभाजीराजांच्या पराक्रमाच्या वर्तांनी बादशहाचे डोके भणभणून गेेले होते. त्याने रागारागाने आपली पगडी जमिनीवर आपटली आणि शपथ घेतली की, ‘‘संभाजीला मारल्याशिवाय पगडी घालणार नाही.’’ तो म्हणतो, ‘‘टिचभर राज्य आणि बोटभर ताकदीचा हा वितभर तरूण आपल्या विस्तृत राज्याला बेजार करू शकतो, ही कल्पना मला सहन होत नाही.’’ मोगलांचा इतिहासकार महंमद हाशीम खाफी खान शंभुराजांबद्दल लिहितो की, ‘‘दृष्ट संभाजी हा, धामधूम आणि उच्छाद करण्यात नरकवासी काफर शिवा पेक्षा दहापटीने अधिक तापदायक ठरला.’’
संभाजीराजांची जलनीती, दुर्गनीती, युद्धनीती अप्रतिम होती. संभाजीराजांनी आपल्या गलबताची संख्या साडेपाच हजार पर्यंत वाढविली. सैन्य तर शिवरायांच्या सैन्याच्या पाचपट जास्त वाढविले. त्याच बरोबर त्यांनी केवळ राज्याचे रक्षण केले असे नाही तर राज्यदेखील वाढवले. एक इंग्रज लेखक लिहितो की, ‘‘नशीब इंग्रजांचे की तो (संभाजी महाराज) जास्त काळा जगला नाही. तो जर आणखी दहावर्षे जगला असता तर, इंग्रजांना भारतावर दीडशेवर्षे राज्य करायचे तर लांबच पण भारतात पाऊलसुद्धा ठेवता आले नसते.’’

दर्यावरून धोका
छत्रपती शंभुराजांनी आपल्या पाच हजार पाचशे गलबतांच्या सहाय्याने इंग्रजांना झोपवले. सिद्दीला नाचवले आणि पोर्तुगीजांना वाकवले. तीनशे पन्नास वर्षांपूर्वी शंभुराजे दर्यावरून (समुद्रावरून) राज्याचे रक्षण करतात आणि त्यांनी लिहून ठेवले आहे की, ‘‘आपल्या राज्याला धोका जमिनीवरून नाही तर दर्यावरून आहे.’’ आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातील आपण आपल्या राजधानीचे सुद्धा रक्षण करू शकत नाही. आठवा 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील हल्ला. आपले सरकार सांगते की, ‘‘आमच्याकडे बोट कमी होत्या’’ मग आपण ठरवावे की श्रेष्ठ कोण? संभाजी महाराज की आजचे सरकार?



तेज पुंज तेजस्वी आखे
निकल गयी पर झुका नही
दोनो पैर कटे शंभु के
ध्येयमार्ग से हटा नही

हात कटे तो क्या हुआं?
सत्कर्म कभी छुटा नही
जीव्हा कटी खुन बहाया
धरम का सौदा किया नही


शाहीर योगेश यांच्या या पंक्ती वाचल्या की, राहून राहून मनात विचार येतो की, एखादा व्यसनी, रंगेल, उग्र प्रकृतीचा, अविचारी, व्याभिचारी व्यक्ती राज्य इतके चालवू शकेल काय? शंभुराजे कोणत्याही गाफीलपणामुळे पकडले गेले नाहीत तर ते फितुरीमुळे पकडले गेले. त्यावेळी ते अवघ्या 32 वर्षांचे होते. त्या औरंगजेबाने त्यांचे डोळे फोडले. जीभ तोडली. हात कापले. तरीही संभाजीराजे झुकले नाहीत. धर्मासाठी बलिदान देणारा असा राजा कुणी पाहिला आहे का? परंतु हे शंभुराजे आमच्या महाराष्ट्राला माहितच नाहीत. किंबहुना ते जाणीवपूर्वक सांगितले गेले नाहीत.
आपले खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांना शंभुराजांनी हत्तीच्या पायी दिल्यामुळे याचा सूड मल्हार रामराव चिटणीस याने शंभुराजांच्या मृत्युनंतर 122 वर्षांनी घेतला आणि तोही सभासद बखरीच्या मुळच्या मसालेदार बखरीत खोट्यानाट्याचाच मसाला बेमालूमपणे घुसडून देऊन संभाजी राजांचे चरित्र लिहिले. संभाजी राजांना व्यसनी ठरवले यानेच. पन्हाळ्याच्या सुभेदाराला कैदी बनवले यानेच. स्त्रीयांशी अनैतिक संबंध चिटकविले यानेच! याच्याच कुपीक मेंदुने सोयराबाई राजेंना भिंतीत गाडून मारल्याचा जावईशोध याचाच! खरे तर सोयराबाईंनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जाते.
शंभुराजांबद्दल अटलबिहारी वाजपेयी लिहितात की, ‘‘व्यक्ती की पुण्याई, व्यक्ती की शक्ती, व्यक्ती का स्वत्त्व प्रकट होता है अंतिम क्षणो मे. संभाजी महाराज समझौता कर सकते थे, पर उन्होने वह नही किया. अगर वह शरीर से दुर्बल होते, अगर मन के कच्चे होते, जीस तरह के व्यसनो का उनके जीवन चरित्र मे उल्लेख किया जाता है, अगर उस तरह के व्यसन के वे शिकार होते तो, अंतिम परिक्षा मेे विफल हो जाते. लेकीन वे अंतिम परिक्षा मे सफल रहे. पिढीयो तक उनके बलिदानसे हमे प्रेरणा मिलेगी. उन्होने जीवन का क्षणक्षण, शरीर का कणकण स्वतंत्रता के लिए समर्पित किया.’’ ही किर्ती आहे माझ्या शंभुराजाची!


 
कोटी कोटी कंठो मे तेरा
आज जयजयकार है
मातृभूमी के चरणकमलपर
जीवन पुष्प चढाया था
है दुजा दुनिया मे कोई
जैसा शंभु राजा था?
क्योंकी वह शेर शिवा का छावा था!


जय महाराष्ट्र..!

सागर सुरवसे

9769 179 823 / 9665 899 823
 
Follow on twitter: @sagarsurawase 

0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!