Thursday 2 August 2012

   राजकारण,  पुण्याचे आणि पाण्याचे
 
'पाणी म्हणजे जीवन' हा मौलिक संदेश रस्त्यावरील फालकांपासून ते शाळेतील वर्गामध्ये आपण आपल्या लहानपणापासून वाचत आलो आहोत. थोर विचारवंतांच्या व्याख्यानापासून  ते ह.भ.प बुवांच्या कीर्तनापर्यंत या विषयावर सातत्याने प्रबोधन घडत असते.मात्र या संदेशाकडे दुर्लक्ष्य केल्याने परिस्थिती जैसे थे !
                       राजकीय नेते तर या संदेशाचे 'Brand अम्बेसादोर' आहेत. हिवाळ्याच्या समाप्तीपासून ते पावसाला सुरु होईपर्यंत त्यांच्या एकाही भाषणाची सुरवात किंवा शेवट  'पाणी म्हणजे जीवन' या संदेशाशिवाय होत नाही.
         'याचकाला दान देणे' असे आपली भारतीय संस्कृती सांगते.मात्र पुण्याचे खासदार आणि हिंदू संस्कृतीचे ठेकेदार असणारे सेना-भाजप  यांना हे तत्त्व मान्य नाही. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दौंडला पाणी देण्याची घोषणा केल्यानेच कॉंग्रेस, भाजप, आणि दोन्ही सेनांनी दौंडला पाणी देण्यास विरोध केला आहे. कारण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी प्रचाराला आणखी एक मुद्दा मिळाला, अशी त्यांची  भावना. शिवाय एखाद्या निषेधाच्या कागदावर सह्या करून विरोध करायला कुणाचे काय जाते? तेवढेच वृत्तपत्रात नावही छापून येते.
         वास्तविकतः परिस्थिती अशी आहे की, जेव्हा पुण्यातील धरणं बांधायची ठरली तेव्हा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या तेव्हा त्यातील काही शेतकऱ्यांचे पुनर्वसन दौंड परिसरात करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारची जास्तीची अपेक्षा न बाळगता त्यांच्या एका पिढीने त्याग केला. आता त्यागाची पाळी पुणेकरांवर आहे. ती त्यांनी विनासायास  स्वीकारणे नैतिकतेला धरून होईल. 
         आजमितीला पुणे शहरातील चार धरणात मिळून दोन टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुणेकरांकडून दरमहा एक टीएमसी पाणी वापरले जाते. म्हणजे पुढील दोन महिने पाऊस पडला नाही तरी पुण्याला पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जर का एक पाण्याची पातळी एक टीएमसीच्या खाली गेली तरच पुण्यात पाणीकपात केली जाईल. ही     वस्तुस्थिती माहिती असताना देखील  विरोधकांनी असा कांगावा करणे म्हणजे शहाजोगपणाचे ठरत आहे.
           संकटसमयी एखाद्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा त्यावर  निर्णय घेणे याला व्यवस्था- पन शास्त्रात मोठे महत्व आहे. पुढे तो निर्णय बरोबर की चुकीचा याची प्रचिती भविष्यातील परिणामातून दिसून येतेच. त्यामुळे पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सध्यातरी योग्यच आहे.
          ही झाली पुण्याच्या राजकीय परिस्थितीची एक बाजू. त्याची दुसरी बाजू पाहणेही महत्वाचे आहे. दौंडप्रमाणेच आळंदीतही पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. आळंदीला पाणी मिळावे यासाठी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मागणी करण्यात आली होती. मात्र ती मागणी फेटाळत पिंपरी पालिकेने पाणी देण्यास नकार दिला. 
                     'जो जे वांछील तो ते लाहो' अशी वैश्विक प्रार्थना करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीला पाणी न देण्याचा करंटेपणाही राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे दौंडकरांना पाणी दिल्याने त्यांचे पाप धुऊन निघेल अशातला भाग नाही शिवाय आळंदी नगरपालिका आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता असल्यानेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्यांना पाणी नाकारल्याचे आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आले आहेत. 
                 दौंडची सत्ता राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांना पाणी देण्याचा निर्णय दादांनी झटक्यात घेतला. याशिवाय दौंड परिसरात राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खाजगी साखर कारखाने असल्याने तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पीक वेळेत येण्याचीही काळजी घेतली जात असल्याचे पुण्याच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 
                  राजकारणात शह-काटशह हे ठरलेलेच असतात. मात्र यात बळी जातो तो विकासकामांचा, नागरी सुविधांचा, महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेचा. त्यामुळे राज्याचा गाडा हाकताना समतोल आणि सर्वांगिण विकास यालाच प्राधान्य दिले गेले पाहिजे. अन्यथा सत्तेच्याअस्थिरतेची तलवार सातत्याने डोक्यावर लटकत राहणार यात शंका नाही. 
                                                                                                          सागर सुरवसे, पुणे     भ्रमणध्वनी : ९६६५ ८९९ ८२३   
Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!