Tuesday 31 March 2015


विधानसभा  निवडणुकीपूर्वी सत्तारूपी वराशी विवाह होण्यापूर्वीच भाजप-शिवसेना या वधूंनी काडीमोड घेतला. खरंतर विवाह झालाच नव्हता पण तो निश्‍चित होता. प्रश्‍न केवळ एवढाच होता की, पट्टराणी कोण होणार? सेना की भाजप? जनतेने दिलेल्या कौलानुसार कमळाबाई पट्टराणी झाली आणि तिने संसार थाटला. हा संसार चालवण्यासाठी तिला सेनाताईची गरज होतीच. त्यानुसार कमळाबाईने आपला विवाह मोठ्या थाटामाटात, कोट्यवधी रूपये खर्चून केला. सेनाताईदेखील आपल्या रूपगर्वितेमुळे आडून राहिली. त्यानंतर कमळाबाईने आपली चाल खेळत सेनाताईला आपली सवत बनविले. 

या सत्तारूपी विवाहाला जेमतेम चार महिनेही पूर्ण झालेले नसताना  या सवती एकमेकांना टोमणा मारण्याची एकही संधी सोडताना पहायला मिळत नाहीत. संधी मिळेल तिथे, मिळेल तेव्हा या सवती एकमेकींचा पानउतारा करू लागल्या. राष्ट्रवादी सासरे मात्र हा सारा खेळ दुरून पाहून गालातल्या गालात हसत आहेत. मुळात या कानपिचक्या, हा पानउतारा, हे टोमणे मारण्याचे कारण म्हणजे मुंबई महापालिकेची जहागिरी कोणाकडे राखायची यासाठी आहे.

राज्यातील जनतेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या भ्रष्ट सरकारला कंटाळून शिवसेना-भाजपच्या पारड्यात मते टाकली. प्रचंड अपेक्षा असलेल्या या युतीतील नेत्यांनी राणाभीमदेवी थाटात अनेक आश्‍वासनं दिली. मात्र सत्तेवर येताच ही आश्‍वासने हवेत विरल्याचं पहायला मिळत आहे. सत्तेच्या धुंदीत आणि मग्रूरीत आजचे सत्ताधारी मश्गुल झालेत. याचाच परिपाक म्हणून हे राज्यकर्ते आपल्याच सरकारमधील मित्रांचा वाट्टेल त्या शब्दात पानउतारा करताना पहायला मिळत आहेत. गेल्या चार महिन्यातील राज्यकारभार करतानाची सेना-भाजपतील वाचाळवीरांची विधाने पाहून नक्की हे सत्तेत आहेत की, विरोधी पक्षातील आहे हा प्रश्‍न तमाम महाराष्ट्रवासीयांना पडतो आहे.


विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपने कॉंग्रेसच्या शिवाजीराव देशमुखांना पायउतार करण्यासाठी राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे साहजिकच शिवसेनेचा तीळपापड झाला. या रागातून सेनेनं शिवाजीराव देशमुखांवरील अविश्‍वासाच्या ठरवाला महाभारत असं संबोधलं. तसंच यामध्ये भाजपला दुर्योधन अशी उपाधी दिल्यानं पांडवांचे समर्थक असलेल्या भाजपला हा अपमान सहनच झाला नाही. याशिवाय सेनेनं त्याचं विश्‍लेषण करताना, या अविश्‍वासाच्या ठरावात भाजपने महाराष्ट्राचं वस्त्रहरण केल्याचा आरोपही केला. सरकार शिवसेना-भाजपचं असलं तरी भाजप-राष्ट्रवादी यांचं शुभमंगल आंतरपाटाशिवाय लागल्याची टीकाही सेनेनं केली. या विधानामुळे शिवसेना नक्की सत्तेत आहे की विरोधीपक्षात हे कळण्यास मार्ग नाही.

मागील महिन्यात शिवसेनेच्या मंत्र्यांना पूर्ण अधिकार दिले जात नसल्याचा आरोप सेनेच्या मंत्र्यांनी केला होता. महसूलमंत्री एकनाथ ख़डसे मनमानी कारभार करत आहेत. ते शिवसेनेच्या मंत्र्यांना कामकाज करू देत नसल्याचाही आरोप केला होता. त्यामुळे ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. त्याला सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनीही दुजोरा दिला होता. एकनाथ खडसे यांनी आपल्याकडील 80 टक्के कामकाज काढून घेतले असल्याचं राठोड यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी मांडले. तसंच खडसेंना अँटी करप्शनच्या फायली हव्यातच कशाला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा की, खडसेंना केवळ अँटी करप्शनच्याच फायली हव्या आहेत. कारण त्या फायली दाबून पक्षनिधी उकळता येतो. मात्र यावेळी दुसरा प्रश्‍नही उपस्थित होतो की, शिवसेनेला तरी यात रस का असावा? त्यामुळे हे सरकार पारदर्शी आहे असे उभय पक्षातील नेत्यांनी म्हणणे फारसे नैतिकतेला धरून राहत नाही.

यापूर्वीही शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी अनेक दिग्गज नेते सरकारमध्ये होते. असे असतानाही पाच वर्षात युती सरकारला जनतेने घरी बसवले. ते तब्बल पंधरा वर्षांसाठी. खरंतर संघाच्या शाखेतील बौद्धिक वर्गात अनेक दिग्गज प्रचारकांचे बौद्धिक ऐकलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांना मागील सरकारला घरी का बसावे लागले याचा बोध घेणे अवघड नाही. 


शिवसेना आपल्या स्टाईलने ’सामना’तून आपली भूमिका मांडत असते. सातत्याने स्वाभिमानाची भाषा करणारी शिवसेना मात्र, ‘मी नाही त्यातली; कडी लावा आतली’, अशीच भूमिका घेताना दिसते. सत्तेत राहण्याची प्रचंड महत्त्वाकांक्षा असताना केवळ फुकाचा दम टाकण्याची नवी परंपरा शिवसेना पक्षप्रमुखांनी सुरू केली आहे. 


गेल्या चार महिन्यात सरकार सत्तेत आले असले तरी प्रत्यक्षात मात्र सत्तेत त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. केवळ एकमेकांची खेचाखेची करणे एवढेच काय ते सत्ताधार्‍यांचे काम उरले आहे. सेना-भाजपच्या या कलगीतुर्‍यात मात्र विरोधक सोयीस्कर भूमिका घेताना दिसत आहेत. आजच्या घडीला राज्यात अनेक समस्या आहेत. मात्र सरकार यावर कोणताही प्रभाव पाडू शकलेली नाही. मुख्यमंत्री अठरा अठरा तास काम करून ट्वीटरवरून आपण अमूक अमूक विभागाच्या सर्व फाईल्स क्लिअर केल्या आहेत, झिरो पेंडन्सी केली असल्याचं ते ट्वीट करून सांगतात. महाराष्ट्रातील जनतेला वाटले होते की, ’देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ या घोषणेप्रमाणे देवेंद्र महाराष्ट्राचा गुजरात करतील, मात्र लोकांची ही अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. मोदी खर्‍याअर्थी मुख्यमंत्री होते. त्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळावर वचक होता. फडणवीस मात्र आपली कातडीबचाव भूमिका घेत, आपण कसे अठरा-अठरा तास काम करतो याचा डांगोरा आपल्या पत्रकारमित्रांकडे पिटताना दिसतात. आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळवीरांकडे मात्र ते सोयीस्कर दुर्लक्ष करतात. 


उद्धव ठाकरे यांचे लक्ष केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडेच आहे. विधानसभेपूर्वी त्यांनी जाहीर केलेल्या शिवआरोग्य योजना, दूरशिक्षण योजनेबाबत मात्र कसलीही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या विकासाबाबतच्या दृष्टीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
अखेर युतीतील ही धुसफुस पाहता काही वरिष्ट नेत्यांना युतीमध्ये समन्वय समिती स्थापन करण्याची वेळ आली आहे. एकाअर्थी सेना-भाजप युतीचे हे अपयश आहे. ही परिस्थिती जर का अशीच राहिली तर मात्र भविष्यात हे सरकार पुन्हा सत्तेवर येण्याचं सोडा, विरोधी बाकावर तरी बसण्यास लायक ठरेल का, हे सांगणं कठीण आहे. मात्र आजच्या घडीला, ’नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे’ या म्हणीप्रमाणे युतीतील नेत्यांची वाटचाल असल्याचं पहायला मिळत आहे.


(लेखाची पूर्व प्रसिद्धी- 'साहित्य चपराक' मासिक, पुणे - एप्रिल २०१५ )

सागर सुरवसे,


९७६९ १७९ ८२३ /  ९६६५ ८९९ ८२३

Follow On Twitter: @sagarsuravase






Monday 30 March 2015



 इंसान का इंसान से हो भाईचारा; यही पैगाम हमारा, यही पैगाम हमारा.. या दिव्य पंक्ती उच्चारत दिल्लीकरांच्या काळजात हात घालणार्‍या आम आदमी पक्षात सध्या ‘भाईचार्‍या’ची जागा ‘भाईगिरी‘ने घेतली आहे. लोकशाही मूल्यांसाठी स्थापन झालेल्या या पावसाळी छत्रीसम पक्षात लोकशाहीला काळीमा फासण्याची जणू चढाओढ लागली आहे. या पावसाळी छत्र्यांप्रमाणे उगवणार्‍या पक्षांची अशी वाताहत होण्याची कारणे म्हणजे त्यांच्यातील सामाजिक निष्ठेचा अभाव! त्यांचा ‘आप’मतलबीपणा!
दिल्लीतील आम आदमी पक्षात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला ‘आप’मतलबीपणा आता लाथा-बुक्क्यांवर येऊन ठेपला आहे. आम आदमी पक्षात चाणक्यीय थाटात वावरणारे योगेंद्र यादव आणि कायदेआझम समजणारे प्रशांत भूषण यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून अखेर लाथा बुक्क्या खाऊन बाहेर पडावे लागेल. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे लोकशाही तत्त्वांचा आपल्या सोयीने वापर करण्यात पटाईत असलेले यादव बैठकस्थळाच्या बाहेरच ठिय्या मांडून बसले. त्यानंतर झाली तेवढी शोभा पुरे म्हणत पक्षाने त्यांना बैठकीत प्रवेश दिला. भूषण यांना या बैठकीला हजर राहण्यास मज्जाव करण्यात आला नव्हता. त्यामुळे ते तेथे उपस्थित होते.
या दरम्यान केजरीवाल समर्थकांनी यादव आणि भूषण यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. याचदरम्यान ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शांति भूषण यांच्या अंगावरही काही कार्यकर्ते धावल्याचा आरोप होत आहे. हा सर्वप्रकार केजरीवाल निवांतपणे पाहत होते. या सर्व प्रकारानंतर केजरीवालांनी, ''मै सभी पदो का इस्तिफा देता हू'' ही आपली रेकॉर्डींग वाजवून सभा स्थळाहून काढता पाय घेतला. त्यानंतर बैठकीची सुत्रे गोपाल राय यांनी हाती घेतली. नियोजनाप्रमाणे चार बंडखोर नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी मतदान घेऊन निलंबीत करण्यात आले. यामध्ये योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, अजित झा, प्रा. आनंद कुमार यांचा समावेश आहे. या सर्व प्रकारानंतर  मेधा पाटकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. खरंतर  मेधाताई या पक्षात किती कृतीशील होत्या हा प्रश्नच आहे. आपमधील राड्याला मिळणाऱ्या राष्ट्रीय मीडिया कव्हरेजचा अंदाज घेवून त्यांनी 'आप'ला राजीनामा दिला असावा. तशा त्याबाबतीत त्या माहीर आहेत.

 




          वास्तविक पाहता एका विशिष्ट प्रकारच्या ध्येयासाठी स्थापन झालेल्या पक्षात फूट पडणे हा काही नवा प्रकार नाही. यापूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातूनच जनता पार्टीचा जन्म झाला होता. इंदिरा गांधींच्या भ्रष्टाचारी, हुकुमशाही राजवटीला कंटाळून एका बुजुर्ग नेत्याच्या नेतृत्त्वाखाली देशातील काही प्रामाणिक नेत्यांसह अनेक स्वार्थी व भ्रष्टाचारी नेते एकवटले आणि जनता पार्टी सत्तेत आली. या पार्टीचा इतिहास पाहता आजच्या आम आदमी पार्टीशी ती बरोबर मेळ खाते. त्याकाळी लालूप्रसाद यादव, शरद यादव यांसारखे नेते पुढे आले. विशेष म्हणजे, शांति भूषण हे त्या सरकारमध्ये होते. आजही ते केजरीवालांच्या पक्षाशी संबंधित आहेत.
        जनता सरकारमधील नेत्यांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा पराकोटीला गेली आणि त्यातून पक्षाला उतरती कळा लागली. आम आदमी पक्षाच्या बाबतीतही तेच घडत आहे. इतिहासाची पाने चाळता, आपल्याकडे अशाप्रकारे अनुभव असूनही भारतीय नागरीक तीच चूक पुन्हा पुन्हा करतात. याचे कारण म्हणजे, देशातील पढतमुर्खतेची पुनरावृत्ती आणि एखाद्या अवतारी पुरूषाची वाट पाहण्याची वृत्ती. मग हा अवतारीपुरूष कधी जयप्रकाशजींच्या रूपाने, कधी मोदींच्या रूपाने तर केजरीवालांच्या रूपात त्यांना दिसतो.
या सर्व प्रक्रियेत सत्तेचं विकेंद्रीकरण होत असलं तरी, मुख्य समस्येवर मात्र इलाज होत नाही. जनता पार्टीला लोकांनी निवडून दिले होते. तरीही ते सरकार चालविण्यास, भ्रष्टाचार, महागाई कमी करण्यास सपशेल  नालायक ठरले होते. जनता पार्टीच्या ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’, ‘महागाईमुक्त भारत’ या तात्कालीक प्रेरणेच्या प्रयोगामुळे त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम राष्ट्राला भोगावे लागले. कारण त्यानंतर पुढची अनेक वर्षे देशाच्या केंद्रीय राजकारणात कॉंग्रेसचा अंमल राहिला. जनता पक्षाच्या फसलेल्या प्रयोगामुळे भारतीयांची मतदानाबाबतची नकारात्मक मानसिकता तयार झाल्याचं पाहायलं मिळतं. नकारात्मक मानसिकतेमुळे लोकशाहीतील सत्तेच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया मंदावली. ती इतकी मंदावली की, थेट 1999 सालीच देशात खर्‍याअर्थी सत्तांतर झाले. आम आदमी पक्षाच्यारूपाने आजही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. मात्र ही पुनरावृत्ती मजबूत लोकशाहीसाठी घातक आहे.

 
या प्रकारच्या प्रयोगात नैतिकतेचा टेंबा मिरवणारे अनेक नेते येतात. मसीहा येण्याच्या दिशेने आशाळभूत नजरा लावून बसलेल्या जनतेला ‘आप’ली स्वप्ने विकतात आणि इतिहासाच्या पानात कंलकित होऊन राहतात. जनता मात्र पुन्हा एकदा नवा मसीहा येण्याच्या खोट्या आशेवर  राहते. जनता पार्टी, आम आदमी पार्टी या नामसंकल्पनासाधर्म्य असलेल्या संघटना फुटण्यामागे एकच कारण असते, ते म्हणजे व्यक्तिगत प्रतिमा उंचावून लोकशाहीरूपी हुकुमशहा बनण्याची. केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाची आजची स्थिती पाहून गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या एका गाण्याच्या ओळी आठवतात...
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
‘आप‘लीच प्रतिमा होते ‘आप’लीच वैरी
घडोघडी आपराधांचा तोल सावरावा...

सागर सुरवसे,
उपसंपादक, 'चपराक', पुणे 
९७६९ १७९ ८२३ /  ९६६५ ८९९ ८२३
Follow On Twitter: @sagarsuravase
 

Monday 16 March 2015


इतिहास आणि वाद हा भारतात नवा नाही. या आधी अनेकदा इतिहासावरून वादंग निर्माण झालेले आहेत. त्यात आता आणखी एक भर पडली आहे ती ‘तारीफ-ई-हुसेनशाही’ या दुर्मीळ हस्तलिखिताच्या परदेशवारीवरून. न्यूयॉर्क मधील मेट्रोपॉलिटन म्युझिअम येथे होणार्‍या ‘दख्खन आर्ट’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ‘तारीफ-ई-हुसेनशाही’ हे मुळ हस्तलिखित ठेवण्यात येणार आहे. मात्र ही हस्तलिखितं देशाबाहेर पाठविण्याबाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांंनी आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे.
‘‘आपल्या दुर्मीळ ऐतिहासिक वस्तू आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात जात असतील तर त्यामुळे देशाचा लौकिक वाढण्यास मदतच होईल. जर आपल्याकडे मौल्यवान वस्तू आहेत तर मग त्या बाहेर पाठविण्यात गैर ते काय?’’ असा सवाल इतिहास संशोधक मंडळाचे सचिव श्री. मा. भावे यांनी केला आहे. एप्रिल ते जुलै असे चार महिने हे प्रदर्शन सुरू असणार आहे. शिवाय यात हैद्राबादपासून ते चेन्नईपर्यंतच्या विविध संग्रहातील ऐतिहासिक वस्तू या प्रदर्शनात जात आहेत, तर मग महाराष्ट्रातील वस्तू तिथे गेल्यास हरकत काय? शिवाय भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या हस्तलिखिताचं मुल्यांकन करून त्याचा विमाही उतरविला आहे. त्यामुळे ही हस्तलिखितं न्यूयॉर्कला पाठविण्यास हरकत नसल्याची भूमिका भावे यांनी घेतली आहे.
याप्रकरणी ‘साप्ताहिक चपराक’ने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि इतिहास संशोधक मंडळाचे सचिव श्री. मा. भावे यांच्याशी सागर सुरवसे यांनी केलेली बातचीत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे


प्रश्‍न: बाबासाहेब, ’तारीफ-ई-हुसेनशाही’ हा दस्तऐवज न्यूयॉर्क येथे होणार्‍या प्रदर्शनात पाठविण्यास तुमचा विरोध का? 
उत्तर : ’तारीफ-ई-हुसेनशाही’ हे हस्तलिखित अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो मलाच नव्हे तर प्रत्येक अभ्यासकाला महत्त्वाचा वाटतो. ते हस्तलिखित अत्यंत दुर्मीळ आहे आणि त्यात 12 चित्रं आहेत. या हस्तलिखिताची किंमत पैशात होईल मात्र अभ्यासाच्या बाबतीत त्याची किंमतच होणार नाही. ते अमूल्य आहे. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की, तुम्ही हा दस्तऐवज खरंच सुखरूप नेणार आणि परत आणणार आहात का? खरं म्हणजे त्याला विरोध करण्याचं कारण नाही. लोकांनी ते पहावं हीच तुमची इच्छा आहे ना? मग ज्यांना हे खरंच पहावयाची इच्छा आहे त्यांनी इथे भारतात, पुण्यात यावं. भारत इतिहास संशोधक मंडळात यावं. त्यांना ते नक्की पहायला मिळेल. मात्र ’तारीफ-ई-हुसेनशाही’ हे हस्तलिखित आम्ही दहाहजार मैल पाठवायचं! मग ते सुखरूप भारतात परत येईल याची हमी कोण देणार? आपल्याकडे एकतर प्रचंड अव्यवस्था आणि अनास्था आहे. त्याचं महत्त्वच लोकांना कळत नाही.

प्रश्‍न: बाबासाहेब त्याचं महत्त्व काय आहे?
उत्तर : चॉंदबीबी नावाची इतिहासातील एक अतिशय महत्त्वाची आणि धाडसी  महिला होती. तिचे वडील हुसेन शहा. त्यांच्याबद्दलची तारीफ, कौतुक म्हणजे हे ’तारीफ-ई-हुसेनशाही’ हे पुस्तक. 1565-66 मध्ये हा ग्रंथ  लिहिण्यात आला आहे. तो हस्तलिखित आहे. जिजाऊ साहेबांच्या आधी नगरमध्ये ही चॉंदबीबी होऊन गेली. तीने दिल्लीचा मोघलशाहीतला राजा अकबराशी झुंज दिली. या झुंजीत चॉंंदबीबीचा दोन वेळा जय झाला. तिसर्‍यांदा मात्र ती मारली गेली. वास्तविक पाहता तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे माहिती नाही, परंतु तिला काही फितुरांनी ऍसीड म्हणजे एच2एसओ4 त्याला आपण सल्फ्युरीक ऍसीड असं म्हणतो, त्या सल्फ्युरीक ऍसीडमध्ये टाकलं. काहींचं म्हणणं आहे की तिने उडी मारली, आत्महत्या केली. तिचा इतिहास हा प्रचंड प्रेरणादायी आहे. तिच्यावर एक संशोधन व्हायला हवं. काही पुस्तकं आहेत तिच्या कारकिर्दीवर, पण तरीही ते पुरेसे नाहीत. वास्तविक पाहता तिचा या पुस्तकाशी फारसा संबंध नसला तरी ’तारीफ-ई-हुसेनशाही’ तिच्या वडिलांवरचे म्हणजे हुसेन निजाम शहा यांची तारीफ, प्रशंसा करणारे हे पुस्तक आहे.
असे हे पुस्तक तुम्ही दूर नेता आहात. म्हणजे एकुलत्या एक मुलाला उत्तर ध्रुवावर पाठवल्यानंतर आईला जशी भीती वाटते तशी भीती या ग्रंथाबाबत आम्हाला वाटते.
प्रश्‍न: असं असलं तरी यामध्ये नक्की कोणत्या प्रकारचे धोके संभवतात?
उत्तर : हे प्रदर्शन आतंरराष्ट्रीय पातळीवरचं आहे. ते लोक किरकोळ नाहीत. ते लोक चांगले आहेत. मात्र ते लोक खरंच या हस्तलिखिताची दक्षता घेतील का आणि सुरक्षिततेची हमी देतील का? त्याचा नुसता विमा उतरवणं हा मार्ग नाही. विमा उतरविल्यावर पैसे मिळतील मात्र त्या हस्तलिखिताला काही झालं तर तो ग्रंथ परत मिळणार नाही. तरीही आमचं असं म्हणणं आहे की, त्या ग्रंथाच्या फोटो कॉपी करून द्याव्यात. आपल्याकडे त्या आहेत. हा ग्रंथ परदेशात पाठवायला इतिहास संशोधक मंडळाच्या पदाधिकार्‍यांना भीती नाही वाटत, मात्र आम्हाला त्याची भीती वाटते. ते दिलं आणि हरवलं तर कोण जबाबदार? राजकारणामध्ये काय वाट्टेल ते होतं. तसं जर झालं तर? आपल्या भारतातून अनंत वस्तू गेलेल्या आहेत. काही वेगवेगळ्या मार्गाने गेल्या आहेत. शिवरायांची जगदंबा तलवार गेलीच ना लंडनला!

प्रश्‍न: शिवरायांची तलवार लंडनमध्ये नक्की कशी गेली?
उत्तर : शिवरायांची जी तलवार आहे ती लंडनला आहे. अर्थात ती काही पहायला किंवा प्रदर्शनासाठी नव्हती नेली. त्यांनी धूर्तपणाने ती तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांच्याकडून त्या इंग्लंडच्या राजाला भेट म्हणून देववली. ही गोष्ट 1875 सालची आहे. त्या तलवारीचं नाव जगदंबा असं आहे, भवानी तलवार असे नाही. ती तलवार शिवाजी महाराजांची आहे. ती अतिशय मौल्यवान अशी तलवार आहे, मात्र आज ती आपली नाही. महाराजांबद्दलची आपली भावना सगळ्यांनाच माहिती आहे. महाराज म्हणजे आपल्यासाठी दुसरे देवच आहेत. मात्र आपल्या देवाची तलवार लंडनमध्ये आहे. ती तलवार आपल्याला आज परत मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपला कोहिनूर हिरा. तोही असाच गेला. कोहिनूर जेव्हा भारताने परत मागितला तेव्हा विन्स्टन चर्चिलने सांगितलं होतकी, ‘‘तो हिरा तुमचा आहे. तुम्हाला द्यायचा असं आमचं ठरलं आहे. फक्त तो पाकिस्तानही मागतंय आणि तुम्हीही मागताय. आता कोणी घ्यायचा हे तुम्हीच ठरवा. आम्ही देतो.’’ त्यामुळे आजतागायत तो हिरा भारतात आला नाही. लंडनमध्ये नऊ पौंडाचं तिकिट काढून पहायला मात्र मिळतो. त्याप्रमाणेच याचं झालं तर? म्हणजे एक एक गोष्ट आम्ही गमावत बसायचं आणि नंतर रडत बसायचं का? अशा किती गोष्टी आमच्या गेल्या आहेत?
एक धक्कादायक गोष्ट आपल्याला पहायला मिळते ती म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात लॉर्ड मिंटो नावाचा एक व्हायसरॉय भारतात होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये ताजमहलचा लिलाव होणार होता. सुदैवानं तो रद्द झाला म्हणून ताजमहल टिकला आणि जगातलं एक आश्‍चर्य म्हणून तो आज राहिला आहे. ताजमहलचा लिलाव ही कल्पनाच किती विक्षिप्त आहे? खरं तर ही गोष्ट खरीच वाटणार नाही, पण ही खरी आहे.

प्रश्‍न: मात्र बाबासाहेब, इतिहास मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत की, मागे एकदा दिल्लीत झालेल्या प्रदर्शनात युरोपमधून एक ममी भारतात आणला होता. भारत सरकारने त्याचा 500 कोटींचा विमा उतरवला होता. मग आपल्या वस्तू तिकडे जाण्यात अडचण काय?
उत्तर : माझं असं स्पष्ट मत आहे की, त्या वस्तुंची किंमत रूपयात करूच नका! त्याची किंमत आहे ती भावनेत आहे. कितीही कोटी पैसे घातले तरी त्याची किंमत भरून निघणार नाही. चॉंदबीबीसारख्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या महिलेच्या वडिलांचं ते चरित्र आहे. पर्शीयन भाषेतला हस्तलिखित मजकूर त्यात आहे. याशिवाय तालकोटच्या लढाईची निजाम शैलीतल्या 12 चित्रांचा समावेशही त्यात आहे. या हस्तलिखितांचा 1925 साली म्हणजे ब्रिटिशकाळात दहा हजार रूपयांचा विमा उतरवलेला आहे. त्यानंतर त्याचा विमा उतरवलेला नाही. मी त्यावेळी तीन वर्षांचा होतो.

प्रश्‍न: असं सगळं असेल तर मग इतिहास संशोधक मंडळाचे पदाधिकारी हे हस्तलिखित परदेशात पाठविण्याचा हट्ट का धरत आहेत?
उत्तर : त्यांचं म्हणणं आहे की, जगातील लोक ते पाहतील. त्यांच्या त्या पाठविण्यामागच्या भावना चांगल्या आहेत. वाईट काहीच नाही. त्याबाबत आम्ही असहमत असायचं काहीच कारण नाही. आम्हाला एकच भीती वाटते ती म्हणजे, सुखरूप जाईल का आणि सुखरूप येईल का? 500 कोटीच्या विम्याला आम्ही किंमत देत नाही. आम्हाला खात्री हवी आहे. देणार आहात का?

प्रश्‍न: मंडळाच्या पदाधिकार्‍यांचा मतप्रवाह असा आहे की, हा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून आलेला आहे. त्यात आम्ही फारसा हस्तक्षेप करू शकत नाही?
उत्तर : आम्ही आमचं सांगण्याचं कर्तव्य केलं. आमची भीती व्यक्तकेली. तो ग्रंथ लोकांनी पहावा असं आम्हालाही वाटतं. तो जगात कोठेही ठेवावा, विरोधाचं आमचं काहीही कारण नाही. मात्र आम्हाला एकच भीती वाटते ती म्हणजे हरवला तर? भारतात अशाप्रकारच्या वस्तू हरविण्याची पद्धत फार जुनी आहे. हे हरवलं आणि ते नेलं असं सगळं फार जुनं आहे. तरीही ते बाहेर जाण्यास आमचा विरोध नाही, मात्र ती सुखरूप जाणार आणि सुखरूप येणार का? याची हमी ते देणार का? अबक अमुक अमुक एकजण खात्री देत आहेत, ते कोण आहेत? ते नागरिक आहेत. त्यांच्या हमी देण्याला काय ताकत आहे? मतभेद फक्त एवढाच आहे की, सुखरूप जाणार का आणि सुखरूप येणार का? खात्री कोण देणार बस एवढंच! बाकी काही म्हणणं नाही. चांगल्या गोष्टीला का म्हणून विरोध करायचा? तिकडे नेण्याचा हेतू चांगला आहे. फक्त प्रश्‍न सुरक्षेचा आहे.

प्रश्‍न: बाबासाहेब, मग तसं तर कोणीच याबाबतची हमी देणार नाही! 
उत्तर : मग नेऊ नका ना! आमचे आत्तापर्यंतचे जे अनुभव आहेत ते काही फार चांगले नाहीत.

प्रश्‍न: यापूर्वी प्रदर्शनासाठी म्हणून अशाप्रकारे कोणती ऐतिहासिक वस्तू परदेशात नेण्यात आली आहे का?
उत्तर : अशा प्रकारच्या वस्तू परदेशात नेल्या की नाही याची यादी मला देता येणार नाही, पण आमच्या कोणकोणत्या वस्तू त्यांच्याकडे आहेत याची यादी मला सांगता येईल. आमची जगदंबा तलवार, कोहिनूर हिरा, गुरूगोविंद सिंग यांची हत्यारंही त्यांच्याकडे आहेत. म्हणजे जे मोलाचं आहे ते तिकडे आणि आम्ही फक्तगल्लीबोळात ‘शिवाजी महाराज की जय’ एवढ्याच घोषणा देत बसतो.

प्रश्‍न: शिवरायांची तलवार मिळवण्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले का?
उत्तर : कुठे काय प्रयत्न केले? काही नाही झालेले आणि जेव्हा कोणी असा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी (ब्रिटिशांनी) चोख अशी उत्तरं दिली की, तुम्हाला काही बोलताच आलं नाही. खूप धूर्त आहेत ते लोक. बाकी आमचा याला बिलकूल विरोध तर नाही. अडाणी विरोध तर बिलकूल नाही. काहींचा अडाणी विरोध असतो. आम्हाला त्याची भीती वाटते हे चक्क त्याचं खरं कारण आहे. आपल्या असंख्य वस्तू त्यांनी नेल्या आहेत.  मी स्वत: त्या ब्रिटिश म्युझिअममध्ये पाहिल्या आहेत. 
----------- 

बाबासाहेब जुन्या जमान्यातले : श्री. मा. भावे
(इतिहास संशोधक मंडळाचे सचिव श्री. मा. भावे यांच्याशी बातचीत…)

प्रश्‍न: ’तारीफ-ई-हुसेनशाही’ हा ग्रंथ परदेशात जाऊ नये असं पत्र बाबासाहेबांनी पाठवलं आहे. मात्र आपण ते परदेशात नेण्यासाठी आग्रही आहात? उत्तर : नाही. ’तारीफ-ई-हुसेनशाही’ हे न्यूयॉर्कला जावं असंही नाही आणि जाऊ नये असंही आमचं म्हणणं नाही. आमच्याकडे त्या मेट्रोपॉलिटन म्युझिअमकडून मागणी आहे. तुमच्याकडे ’तारीफ-ई-हुसेनशाही’ हे पुस्तक आहे, आम्ही एप्रिलपासून जुलैपर्यंत ’दक्षिणी कला’ या विषयाचं प्रदर्शन न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझिअममध्ये ठेवू इच्छितो. तुमच्याकडे हे अतिशय उत्तम प्रकारचं कलेचं पुस्तक आहे. त्यात हस्तलिखित आहे, त्यात 12 चित्रं आहेत. तेव्हा ते तुम्ही आमच्याकडे पाठवा. त्यानंतर आम्ही पाठविण्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याशी एमओयु केलेला आहे. सांस्कृतिक खात्याने ह्या सर्व वस्तू गोळा करून न्यूयॉर्कमध्ये पाठवायच्या आणि परत आणायच्या ही जबाबदारी घेतलेली आहे. सांस्कृतिक खात्याने हे सगळं काम दिल्लीच्या नॅशनल म्युझिअमकडे म्हणजे सरकारच्या अखत्यारितल्या सरकारकडे हे काम सोपवलं. त्यांच्याकडून आम्हाला पत्र आलं की, तुम्ही ’तारीफ-ई-हुसेनशाही’ हा ग्रंथ पाठवायला तयार आहात का? आम्ही म्हटलं पाठवू. एवढाच यातला भाग आहे.
आमचं म्हणणं असं आहे की, आमच्याकडे जर अशी एक अजोड कलाकृती आहे. तर ती जगभरात पाठवायला काय हरकत आहे? जगभरात जी प्रदर्शनं भरतात ती अशीच भरतात ना? जगभरातून त्या वस्तू येत असतात, मग त्यात आपल्या वस्तू गेल्या तर काय बिघडलं? मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये 2 वर्षापूर्वी इजिप्शीयन संस्कृतीचं प्रदर्शन भरलं होतं. तेव्हा अमेरिकेतून, युरोपमधून ममीज आणल्या होत्या. त्यामुळे आपणही त्या पाठवायला काही हरकत नाही, असं आमचं मत झाल्यामुळे आम्ही त्या पाठवायचं ठरवलं. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही तर तेच आमच्याकडे आले आणि आम्हालाही त्यात काही गैर वाटलं नाही.
बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की, ह्या अजोड कलाकृती आहेत. त्या पाठविणं धोक्याचं आहे आणि तो धोका इतिहास संशोधक मंडळानं पत्करू नये! हेही मत असू शकतं ना!! ठीकच आहे. त्यांना तसं वाटत असेल. आम्हाला असं वाटतं, कारण आम्ही त्यांच्यापेक्षा थोडे आधुनिक असल्यामुळे! ते पाठवायला काही हरकच नाही. आता तुम्ही जर असं म्हणायला लागलात की विमान पडणार आहे, म्हणून विमानातनं जाऊ नये, असं कधी चालतं का? पण जुन्या लोकांना तसं वाटत राहतं. आम्हाला असं वाटतं की काही हरकत नाही. अर्थात आम्ही उद्या त्याच्यावर निर्णय घेणार आहोत. यात आमचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. लोकाना जर वाटत असेल की नको पाठवायला तर नाही पाठवत. आमच्या मध्यावधी समितीचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ त्यात नाही. 

प्रश्‍न: बाबासाहेब म्हणत आहेत की, माझा याबाबतचा अनुभव वाईट आहे. त्यामुळे हे पाठवायला नको
 उत्तर : बरोबर आहे की! त्यांचा अनुभव वाईट असेल. मात्र या प्रकरणात हिंदुस्थान सरकार मध्यस्थ आहे. म्हणजे आपण थेट मेट्रोपॉलिटन म्युझिअमशी व्यवहार करत नाही आहोत. हा सर्व व्यवहार सरकारच्या माध्यमातून होतोय. आता आपलाच आपल्या सरकारवर विश्‍वास बसत नसेल तर मग काय करायचं? 

प्रश्‍न: मात्र तरीही याची हमी कोण घेणार असा बाबासाहेबांचा सवाल आहे
 उत्तर : बरोबर आहे, याची हमी कोणीच घेणार नाही, पण तरीही मग आपण आपल्या वस्तू जगासमोर आणायला नकोत का? एवढाच केवळ आमचा हेतू आहे. 

प्रश्‍न: बाबासाहेबांची एक सूचना आहे की, ती मूळ प्रत पाठविण्याऐवजी त्याच्या स्कॅन केलेल्या कॉपीज तेथे पाठवाव्यात?
उत्तर : स्कॅन कॉपी पाठवायला काही हरकत नाही, मात्र त्याला अर्थच नाही. जी मुळ प्रत आहे तीच महत्त्वाची आहे. आमच्याकडे त्या ’तारीफ-ई-हुसेनशाही’च्या सात-आठ स्कॅन कॉपीज आहेत. सीडीसुद्धा आहे. परंतु प्रदर्शनासाठी मूळ वस्तू महत्त्वाची आहे.  लता मंगेशकर वगैरे यांच्या गाण्याच्या सीडीज आहेतच की, पण तरीही त्या स्वत: लंडनला जाऊन का कार्यक्रम करतात? त्यामुळे एखादी वस्तू किंवा व्यक्ती प्रत्यक्ष असणं याला वेगळं महत्त्व आहे. 

प्रश्‍न: बाबासाहेबही म्हणतात की, तुमचा उद्देश पवित्रच आहे पण तरीही त्यांना भीती आहे?
उत्तर : वास्तविक पाहता, बाबासाहेबांची भीती ही खरीच आहे, पण त्यातून उत्तर काय काढायचं हा मुद्दा आहे. त्यामुळे उद्या आमच्या मध्यावधी समितीत याबाबत निर्णय होईल. 

प्रश्‍न: तुमची समिती नेमकी कशी आहे? त्यात कोणकोण पदाधिकारी आहेत?
उत्तर : आमची पाचजणांची मध्यावधी समिती आहे. त्यात प्रा. उत्तम बाजीराव भाईटे हे अध्यक्ष, मी स्वत: सचिव, चंद्रशेखर हरी जोशी खजिनदार, प्रा. प्रसन्नकुमार अकलूजकर आणि ऍड. महिंद्र कोठारी असे पाचजण आहोत. तर आम्ही पाचजणांनी हा एकमताने निर्णय घेतला होता की आपण ते पाठवूयात! पण बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही उद्या पुन्हा एकदा विचार करतोय, काय करायचे ते.   

प्रश्‍न: त्या प्रदर्शनात साधारणपणे भारतातील कोणकोणत्या राज्यातून आणि कोणत्या वस्तू जाणार आहेत?
उत्तर : भारतातील अनेक राज्यातील दुर्मीळ वस्तू जाणार आहेत. हैद्राबादमधल्या संग्रहालयातून, कर्नाटकातल्या संग्रहालयातीलही वस्तू जाणार आहेत.

प्रश्‍न: ’तारीफ-ई-हुसेनशाही’चं महत्त्व काय आहे?
उत्तर :  त्याचं महत्त्व म्हणजे, त्यात बारा चित्रं आहेत. साधारण 1671 सालचं ते पुस्तक आहे. ती पुस्तकं थोडीशी विटली आहेत, पण अजूनही ती उत्तम प्रकारची आहेत. त्यात खास म्हणजे, दक्षिणी शैलीची ती चित्रं आहेत. मुसलमान शैलीतली ती नाहीत. 

प्रश्‍न: आपल्या बोलण्यावरून वाटतं आहे की, आपण ती हस्तलिखितं न्यूयॉर्कला पाठवणारच?
उत्तर :  नाही, मी सांगितल्याप्रमाणे, आमच्या मध्यावधी समितीची उद्या बैठक होणार, त्यात सर्वांना ते मान्य झालं तर पाठवणार, नाहीतर नाही.

सागर सुरवसे,
उपसंपादक, 'चपराक', पुणे 
९७६९१७९८२३ 
Follow On Twitter: @sagarsuravase



Sunday 1 March 2015



पुणे महानगरपालिका
मराठी भाषा वृद्धींगत होण्यासाठी, तिचा प्रचार प्रसार होण्यासाठी पुणे महानगरपालिकेने मराठी भाषा संवर्धन समितीची स्थापना केली. जगभरातील ही एकमेव महापालिका आहे, जिने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशाप्रकारची समिती स्थापन केली आहे. मात्र इथेही नेत्यांनी आणि पालिका आयुक्तांनी आरंभशूरपणाचे दर्शन घडवत या समितीला कोमेजून टाकण्याचा घाट घातला आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महापौर दत्तात्रेय धनकवडे 
पालिका आयुक्त कुणाल कुमार 
सभागृह नेते सुभाष जगताप यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार 2012 साली या मराठी भाषा संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. महापौर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. याशिवाय सर्वपक्षाचे गटनेते, वैधानिक समितीचे अध्यक्ष, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उच्च माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशा प्रशासकीय विभागातील मंडळींना या समितीचे सदस्यत्व देण्यात आले. याशिवाय नऊ अशासकीय व्यक्तिंचीही यात निवड करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी, पुणे विद्यापीठाचे मराठी भाषा विभाग प्रमुख अविनाश सांगोलेकर, महात्मा फुले अध्यासन विभागाचे प्रमुख प्रा. हरी नरके, समर्थ मराठी प्रतिष्ठानचे अनिल गोरे उर्फ मराठी काका, प्राचार्य श्याम भुर्के, संजय भगत, गझलकार प्रदीप निफाडकर, सुधीर नारखेडे यांचा यामध्ये समावेश आहे.
समितीची स्थापना झाल्यानंतर पहिल्या वर्षी म्हणजे 2012-13 साली समितीसाठी 2 लाखांची तरतूद करण्यात आली. त्याच्या पुढील वर्षी 2013-14 साली 10 लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र दोन्हीही वर्षात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कोणताही विशेष उपक्रम राबविण्यात आला नाही. 2013-14 साली केवळ पुस्तक प्रदर्शन हा एकमेव अपयशी उपक्रम राबविण्यात आला. तो प्रयोग अपयशी होण्यासाठी पालिका प्रशासनच जबाबदार असल्याचं पहायला मिळालं. यंदाच्या वर्षीही चालू अर्थसंकल्पात या समितीसाठी 65 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यावर्षीही प्रशासनाची तीच उदासीनता पहायला मिळत आहे. कारण या 65 लाखापैकी केवळ 2 लाख रूपयेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी खर्च करण्यात आले आहेत.
याशिवाय मराठी भाषेतील सात प्रकारच्या साहित्याला 25 हजार रूपयांचे बक्षीस देण्याचे बैठकीत ठरले असूनही अद्याप त्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलल्याचं पहायला मिळत नाही. मराठी भाषा संवर्धन समितीबाबत प्रशासनाचा आणखी एक अनास्थेचा कळस म्हणजे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अद्याप समितीच्या एकाही बैठकीला हजेरी लावलेली नाही. याशिवाय समितीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमणे, स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची तरतूद करण्यात आलेली आहे, मात्र त्याबाबतही कोणतीच ठोस भूमिका पालिका प्रशासन व महापौर यांनी घेतलेली नाही. त्यामुळे एकीकडे मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. समाजमाध्यमातून त्यासाठी मोठी चळवळ उभारली जात आहे. मात्र पुणे पालिकेकडून यासाठी कोणतेही ठोस काम केले जात नाही. वास्तविक पाहता भाषेच्या संवर्धनासाठी या प्रकारची समिती स्थापन करणारी पुणे मनपा ही जगातील एकमेव महापालिका आहे. याचा मोठा गवगवा करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुणे महापालिकेने ठोस काम करून जगाला आदर्श देण्याची हीच तर खरी वेळ आहे.
सागर सुरवसे 
9769179823
Follow On Twitter : @sagarsurawase 
Google +Sagar Surawase 
Email: sagar.suravase@gmail.com

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!