Monday 15 February 2016


                 साधारणपणे 2011 साली पत्रकारितेत येण्याचा विचार मनात आला. त्यामुळे अनेक थोरा-मोठ्या पत्रकारांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी अनेकांनी वाचन वाढविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात ग्रंथालयाचा सभासद होण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती घेण्यासाठी पुणे मराठी ग्रंथालयात गेलो. त्यावेळी समोरच्या एका रॅकमध्ये असलेले एक मासिक सहज चाळण्यासाठी घेतले. पत्रकारितेचा आरंभ करताना मासिक म्हणजे काय असते हे पहिल्यांदाच पाहत होतो. त्याचवेळी त्या मासिकाचे नाव थोडं विचित्रच वाटलं. नाव तसं नियमित ऐकण्यातलं, मात्र ते मासिकाचं नाव असणं थोडं हटके वाटलं. अंक चाळत गेलो तेव्हा त्यातील विषयही वाचले. बसल्या बसल्या त्यातील संपादकीय लेखावर सहज नजर गेली. चार ओळी वाचाव्या म्हणून हाती घेतल्या आणि संपूर्ण लेख वाचून कधी झाला ते कळले नाही. मेंदूला झिणझिण्याच आल्या. लेख वाचल्यानंतर खाली नाव होते, घनश्याम पाटील, संपादक, साहित्य चपराक. मला वाटले कोणीतरी बुजुर्ग व्यक्ती असावेत. कारण त्यातील भाषाच तशी पोक्त होती. म्हणून संपूर्ण संपादक मंडळ पाहिले. त्याचवेळी त्याखाली एक ओळ लिहिली होती, 'अंकातील मजकुराशी संपादक कदाचित सहमत असतीलही.' ही एक वेगळीच धाटणी पाहून या संपादकांना भेटावे असे वाटले. ताबडतोब त्यातील नंबरवर फोन लावला मात्र तो फोन काही रिसिव्ह झाला नाही.
त्यानंतर काही दिवस असेच गेले. ते मासिक विवेकानंद केंद्रातही पाहायला मिळाले. त्यात आमचे सोलापूरचे मित्रवर्य सिद्धाराम पाटील यांचा ‘कसाब निर्मिती कारखान्याचे काय?’ हा लेख वाचायला मिळाला. लागलीच सिद्धाराम पाटलांना फोन केला. ‘चपराक’च्या संपादकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लागलीच घनश्याम पाटील यांना फोनाफोनी करून भेटण्याचा मार्ग मोकळा करून दिला. पुढे 10 नोव्हेंबरला त्यांनी भेटण्याची वेळ दिली आणि भेट झाली. त्यांना भेटल्यानंतर हेच संपादक असल्याचा विश्वास बसेना. कारण आपल्या वयाचा संपादक असू शकतो हे पहिल्यांदाच पाहत होतो. त्यातही तो मेंदूला झिणझिण्या आणणारा अग्रलेख वाचून तर त्यावर विश्वासच बसेना. पहिल्या भेटीतच मी घनश्याम सरांना कामाची संधी देण्याची विनंती केली. त्यांनीही लागलीच रूजू होण्यास सांगितले आणि 11 नोव्हेंबर 2011 पासून माझ्या पत्रकारितेला सुरूवात झाली.
त्या दिवसापासून घनश्याम पाटील हे रसायन समजून घेण्याचा प्रयत्न आजतागायत सुरू आहे. घनश्याम पाटील यांच्या सहवासात अनेक दिवस काम केले. त्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू मला अनुभवायला मिळाले. साहित्याबाबतची त्यांची तळमळ अनेक घटनांमधून समोर येते. त्यांचे साहित्यप्रेम सांगणारी एक घटना म्हणजे उमेश सणस लिखित ‘शिवप्रताप’ ही ‘चपराक प्रकाशन’ची पहिली वहिली कादंबरी. एप्रिल 2006 साली या कांदबरीचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतरचा हा प्रसंग. सातार्‍यामधील एका पुस्तक विक्रेत्याने साधारण सायंकाळच्या सुमारास फोन केला. ‘‘शिवप्रताप कादंबरीच्या पाच प्रती हव्या आहेत. आमचे एक ग्राहक उद्या अमेरिकेला जाणार आहेत. त्यांना तेथील मराठी भाषिकांसाठी या प्रती हव्या आहेत.’’ त्यावर प्रकाशक या नात्याने घनश्याम पाटील यांनी त्यांना शब्द दिला की, ‘‘सकाळी 7 वा तुम्हाला कॉपीज मिळतील.’’ त्यानुसार पाटील यांनी थंडीची तमा न बाळगता रातोरात दुचाकीवर प्रवास करून सकाळी सात वाजता त्या पुस्तक विक्रेत्याला शिवप्रतापच्या पाच प्रती पोहोच केल्या. प्रकाशक स्वतः या प्रति घेऊन आले आहेत हे कळल्यानंतर मात्र तो पुस्तक विक्रेता आश्चर्यचकीत झाला. ‘‘केवळ पाच प्रती देण्यासाठी आपण एवढ्या दूर प्रवास करून आलात. यात तुम्हाला काय फायदा मिळणार?’’ त्यावर पाटील म्हणाले, ‘‘यातून आर्थिक फायदा जरी मिळणार नसला तरी या सुंदर कलाकृतीपासून अमेरिकेतील माझे मराठी बांधव दूर राहू नयेत अशी माझी इच्छा आहे. शिवाय एखाद्या लेखकाचे किंवा प्रकाशकाचे पुस्तक अमेरिकेत वाचले जाणार असेल तर त्याहून मोठा आनंद कोणता?’’ घनश्यामजींनी दिलेले उत्तरच त्यांची साहित्यविषयक तळमळ व्यक्त करते. एखाद्या क्षेत्राबाबतची तळमळ आव आणून शब्दातून व्यक्त करू शकतो मात्र प्रत्यक्ष कृतीतून दिसणार्‍या तळमळीला तोडच नसते. घनश्यामजींची तळमळ ही कृतीशील होती.
भेटायला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ते लिहिण्यासाठी उद्युक्त करतात. बस्स. लोकांनी लिहितं व्हावं यासाठी ते कायम आग्रही असतात. नवीन लेखक लिखाणाबाबत टीप्स मागायला आल्यावर ते सांगतात, ‘‘जो चांगला विचार करू शकतो तो चांगले लिहू शकतो.’’ लिखाणासाठी त्यांनी अनेकांना प्रोत्साहन दिले आहे. त्यातील एक जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतःच. घनश्यामजी नसते तर कदाचित मी आज पत्रकारितेतही नसतो. लिखाणाचे सर्व धडे त्यांच्याकडूनच घेतले. 2014 च्या दिवाळी अंकासाठी त्यांनी मला लेख लिहायला सांगितला. त्यानुसार कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारक आणि विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या कार्याचा आढावा घेणारा एक लेख मी लिहिला. अंक प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, ‘‘एकनाथजींवर आपण एक पुस्तक लिहावे.’’ त्यावेळी माझ्यात तो आत्मविश्वास नव्हता मात्र घनश्यामजींनी ज्या पद्घतीने मला आत्मविश्वास दिला त्यामुळे मी ते लिहू शकलो.
घनश्याम पाटील यांची पार्श्वभूमी आपल्याला आश्चर्यचकीत करते. कारण मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून येऊन पुण्यासारख्या शहरात आपले साप्ताहिक, मासिक आणि प्रकाशन संस्था चालवणे तशी सोप्पी गोष्ट नाही. इयत्ता सातवीच्या वर्गात असल्यापासून घनश्यामजी पत्रकारितेत आहेत. सुरवातीला किल्लारी भूकंपानंतर सोलापूर तरूण भारत या वृत्तपत्राचे किल्लारी वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिले. दहावी झाल्यावर त्यांनी पुण्याकडे कूच केली. अकरावीला असतानाच त्यांनी ज्येष्ठ संपादक वसंतराव काणे यांच्या दै. संध्या या सायं दैनिकात कामाला सुरूवात केली. संध्या हे राज्यातील पहिले सायं दैनिक. त्यामुळे त्याला मोठी परंपरा. वसंतराव काणे यांच्या मुशीतच त्यांची आणखी जडण घडण झाली. काही कारणाने संध्यातील काम सोडल्यानंतर त्यांनी स्वतःचे मासिक सुरू करण्याचे ठरविले. बारावीच्या वर्गात असताना त्यांनी ‘चपराक’ हे मासिक सुरू केले. वयाच्या सतरा-आठराव्या वर्षी संपादकपद भूषवणारे राज्यातील ते एकमेव संपादक असावेत. ज्या वयात आपण कोणत्या क्षेत्रात जायचे याबाबत साशंकता असते त्या वयात घनश्यामजी एका मासिकाचे संपादक होते. 2003 साली त्यांनी ‘चपराक’ची सुरूवात केली. त्यानंतर पुढे दैनिकही चालवले. गेल्या 13 वर्षापासून ‘चपराक’ने राज्यासह राज्याबाहेरही आपली ओळख निर्माण केली आहे.
गेल्या 13 वर्षापासून घनश्यामजी अविरतपणे साहित्य क्षेत्रासाठी झटत आहेत. आपल्या ‘चपराक’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लेखक तयार केले आहेत. तरूणांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सागर कळसाईत सारख्या अवघ्या 23 वर्षाच्या लेखकाला त्यांनी ‘कॉलेजगेट’ या कादंबरीच्या माध्यमातून समोर आणले आहे. आज कॉलेजगेट कादंबरीच्या दोन वर्षात चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. सागर सारखे अनेक लेखक त्यांनी पुढे आणले आहेत. आज ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यामातून घनश्यामजींनी 80 हून अधिक पुस्तके प्रकाशित करून साहित्याची सेवा केली आहे. दिवसरात्र केवळ साहित्याचाच विचार करणारे हे तरूण संपादक, प्रकाशक आता साहित्य परिषदेच्या निवडणुकीस उभे राहिले आहेत. मुळात त्यामागे त्यांचा हाच विचार की, केवळ काठावर राहून आपण पाण्याची खोली मोजू शकत नाही. त्यासाठी पाण्यात उतरणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. साहित्यविषयक आत्मियता असलेल्या मतदारांनी या निमित्ताने साहित्य परिषदेत काही निर्णायक बदल करण्यासाठी घनश्याम पाटील यांच्या पाठिशी उभे राहावे ही विनंती.
-सागर सुरवसे,
आयबीएन लोकमत,
सोलापूर
9769179823

0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!