Saturday 7 January 2012


...अन्यथा पत्रकारिता 'दीन' होईल'
"वृत्तपत्रे  हे जनजागृतीचे आणि क्रांतीचे एक बलाढ्य साधन आहे. हीच गोष्ट आजपर्यंतच्या मराठी वृत्तपात्रांनी दाखवून दिली आहे. त्यागाची नि पराक्रमाची तेजस्वी परंपरा पुढे चालविण्यासाठी कडव्या ध्येयवादी पत्रकाराची आज महाराष्ट्राला अतिशय जरुरी आहे.पत्रव्यवसाय हा जरी धंदा असला, तरी पत्रकाराची वृत्ती मात्र एक महान धर्म आहे. धंद्याला धर्माचे स्वरूप द्यावे, पण धर्माचा मात्र धंदा करू नये. जनजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती व्हावी म्हणून पत्रकाराच्या लेखणीमधून क्रांतिरसाच्या चिळकांड्या उडाव्या आणि वृत्तपत्रे ही क्रांतिरसाची कारंजी व्हावीत. जनता क्रांतीचा जयजयकार करणे हाच पत्रकाराचा खरा धर्म आहे. "  - आचार्य अत्रे .
           पत्रकारिता म्हणजे लोकशाहिचा चौथा आधार स्तंभ . जो न दिसणारा मात्र परिणाम साधणारा आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ असो वा गोवा मुक्तीसंग्राम असो, सदैव अग्रस्थानी राहून सामाजिक व राजकीय न्याय मिळवून दिल्यानेच कि काय? ती लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ बनली आहे. पत्रकारिता ही समुद्राच्या तळापेक्षाही खोल आहे. समुद्राचा तळ एकवेळ आपल्याला सापडेल मात्र पत्रकारिता आपल्याला सापडणार नाही. तिला सुरवात आहे परंतु अंत नाही. रोज नवी आव्हाने, रोज नव्या कल्पना घेवून पत्रकारितेची सकाळ होते. आणि सुख -दुख देवून तिची संध्याकाळ होते. दुरून ती सूर्याप्रमाणे देदीप्यमान दिसते. जर तिच्या  जवळ गेलात की ती व्यक्तिगत आयुष्याला,अस्तित्वाला जाळून टाकते. अनेक हवशे -नवशे तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र एक झळ लागली की ते दूर निघून जातात.
                                       पत्रकारीते बाबतीत एक म्हण नेहमी सांगितली जाते, 'घरचं खावून ;लष्कराच्या भाकऱ्या  भाजणे म्हणजे पत्रकारिता'.   लोकमान्य टिळक ,                             श्री. आगरकर,आचार्य अत्रे,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदि मंडळींनी जर का ह्या लष्कराच्या भाकऱ्या भाजल्या नसत्या तर आज आपण स्वाभिमानाची भाकरीदेखील खाल्ली नसती. स्वामी विवेकानंदानाही पत्रव्यवसायाचा मोह आवरला नाही. शिकागोमध्ये असताना त्यांनी आपल्या शिष्यांना पत्राद्वारे सूचना केली, की "एक मासिक पत्रिका प्रकाशित करा".
     पूर्वी पत्रकारिता धर्माला प्रथम स्थान तर व्यवसायाला दुय्यम स्थान होते. विश्वनियमाप्रमाणे  काळ बदलत गेला. आयते स्वातंत्र मिळालेल्या पिढीने व्यवसायाला प्राधान्य तर  धर्माला दुय्यम स्थान दिले. सहाजिकच त्यामुळे आपापसातील हितसंबंध वाढत गेले. आज त्याने त्याची परिसीमा गाठली आहे. जर का एखाद्या व्यावसायिकाने जाहिरात दिली की त्याच्या विरोधात बातमी छापायची नाही. त्या उलट जाहिरात नाही दिली तर बातमी छापायची. आतातर नवीन प्रकार पाहायला मिळतो आहे की, एकाद्याने दुसऱ्या वृत्तपत्रात जाहिरात दिली व आपल्याला दिली नाही तर त्याच्या विरोधात बातमी छापायची.हा प्रकार वाढत आहे. बातमी बरोबरच जाहिरात हा वृत्तपत्राचा आत्मा आहे. यापैकी कोण एकाला मारलं तरी जीव मात्र पत्रकारीतेचाच जाणार आहे. पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवणे महत्वाचे आहे. वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत मुद्रित माध्यमांनी (प्रिंट मिडियाने ) त्यांची विश्वासार्हता बऱ्यापैकी टिकवून ठेवली आहे. परंतु येणारी पीढी ती कितपत टिकवून ठेवू शकते हे सांगणे कठीण आहे. 
 आजच्या आम्हा तरुण पिढीतील पत्रकारांना मुळात पत्रकारिता म्हणजे काय? हेच काळात नाही. पत्रकारिता म्हणजे  स.१० ते रात्री ८ ची ड्यूटी अशीच त्यांची कल्पना आहे.                                        
                    आज विविध वृत्तपत्रविद्या शिकविणाऱ्या संस्थामधून विद्यार्थ्यानमध्ये आपली विचारधारा रुजविण्याचे काम शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे. आणि हीच गोष्ट समाजासाठी घातक ठरत आहे. किंबहुना पत्रकारितेच्या विश्वासार्हतेसाठीही.     जे चूक ते चूक आणि जे बरोबर ते बरोबर अशीच वृत्तपत्रांची भूमिका असावी. मात्र काही विशिष्ठ विचारधारेच्या कंपूने ही भूमिका बदलवली आहे. पत्रकाराची इच्छा नसतानाही मालकशाहीमुळे त्यांना त्यांची लेखणी गहान टाकावी लागत आहे. 
       लोकमान्य टिळक म्हणतात,"गुळगुळीत कागदावर बुळबुळीत अग्रलेख  लिहिणे म्हणजे पत्रकारिता नव्हे". जर का आजच्या पत्रकारांनी आपली   व्यक्तिगत   विचारधारा समाजावर न लादता चतुरस्त्र,परखड,रस्ता व कर्तव्यदक्ष या चतु:र्सुत्रीप्रमाणे कार्यरत राहिले तर आणि तरच पत्रकारितेची विश्वासार्हता टिकून राहील. अन्यथा पत्रकारिता 'दीन' होईल.             
                                                                                                             -सागर सुरवसे , ९६६५८९९८२३ 
   समाजात आपल्या आजुबाजूला दररोज अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असतात. त्याच्या वयोमानानुसार प्रतिक्रियाही उमटतात. मात्र आपण ती गोष्ट सर्वांसोबत 'शेयर' करू शकत नाही. कारण आपल्याकडे माध्यम नाही. ही उणीव लक्षात घेवूनच मी हा ब्लॉग चालू केला आहे.
      या ब्लॉगमध्ये प्रकाशित होणाऱ्या सर्वच लेखांशी, बातम्यांशी आपण सहमत असालच असे नाही. मात्र त्यावरील आपली प्रतिक्रिया जरूर कळवावी; चांगली- वाईट  कोणतीही. कारण ते जिवंतपणाचे लक्षण असते. या ब्लॉगमध्ये  कोणत्याही एकांगी विचारधारेचा समावेश नसणार आहे. राष्ट्रीय हितासाठी जे चांगले त्याचे सदैव स्वागत असणार आहे . कोणत्याही पक्षाशी आपण बांधील  असणार नाही . जे चांगले ते चांगले, जे वाईट ते वाईट हीच भूमिका असणार आहे. आपणही आपले विचार, लेख, बातम्या पाठवू शकता. त्याचे सदैव स्वागत राहील. त्यासाठी vijaypath150@gmail .com या ईमेल आयडी वर मेल पाठवा. सोबत फोटो असेल तर तो ही पाठवा.

                                                                                                       आपला मित्र ,
                                                                                                        सागर सुरवसे 
                                                                                                     ९७६९१७९८२३/ ९६६५८९९८२३ 
Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!