Monday 23 February 2015



’संयम बाळगतो म्हणजे गांडुची औलाद समजू नका. याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. लाल सलाम!’ गोविंदराव पानसरे यांच्या मृत्युची बातमी आल्यानंतर माझ्या एका जबाबदार पत्रकारमित्राची ही पहिली प्रतिक्रिया. गोविंदरावांची हत्या कुणी केली याचा तपास भविष्यात लागेल. मात्र, गोविंदरावांच्या विचारांची, तत्त्वांची हत्या करणारा मात्र माझा मित्रच निघाला. तसा तो एकटाच आहे असे म्हणायचे कारण नाही. त्यासारखे शेकडो तथाकथित पुरोगामी कार्यकर्ते राज्यभरात आहेत. काही तर संपादक, वकील, उद्योजक व लेखकसुद्धा आहेत.

याशिवाय माझे आणखी काही पुरोगामी मित्र आहेत. त्यांच्याही प्रतिक्रिया इथे सांगणे क्रमप्राप्त ठरते.
- ’हरामखोरांनो, गोळ्या घालून विचार संपत नसतो, हे गांधी हत्येनंतरही तुमच्या लक्षात आले नाही. गांधी, दाभोलकर आणि आता पानसरे सरांची हत्या. आम्ही या विचारांचे सच्चे वारसदार आहोत. तुमच्या गोळ्यांना भीक घालत नाहीत. ही लढाई आम्ही अर्धी सोडणार नाही, कॉम्रेड!’

- ’खरा शिवाजी घराघरांत पोहचवणे गरजेचे आणि नथुरामाच्या अवलादींशी लढा देणे हाच एकमेव पर्याय!’
- ’ज्या धर्मासाठी किंवा धर्माच्या नावाखाली 82 वर्षांच्या व्यक्तिची हत्या होते, व्यक्त होण्याचा सोडा जगण्याचाच हक्क, अधिकार हिरावला जातो, तो धर्म सहनशील कसा असू शकतो? अशा धर्माचा त्याग केलाच पाहिजे.’

वरील उपटसुंभांच्या प्रतिक्रियांचा सूर असा आहे की, ही हत्या हिंदुत्त्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रत्यक्षात मात्र याबाबत कोणताही पुरावा किंवा सुगावा कुणाकडेच नाही. वरील आरोपांमुळे डॉ. दाभोलकरांची हत्या कुणी केली हे कळत नाही, परंतु त्यांच्या विचारांची हत्या करणारे मात्र त्यांचे तथाकथीत अनुयायीच आहेत. कारण, डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा त्यागण्याचा अट्टाहास धरला होता. त्यांनी अनेकांचा भोंदूपणादेखील पुराव्यानिशी उघड करून दाखवला होता. मात्र, आज त्यांचेच अनुयायी म्हणवून घेणारे उपटसुंभ कोणत्याही पुराव्याअभावी दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या हिंदुत्त्ववादी संघटनेतील लोकांनी केली, अशी अंधश्रद्धा बाळगून आहेत. महापुरूषांचा किंवा विचारपुरूषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात हे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

याठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे, गांधींनंतर दाभोलकर, पानसरे यांचा क्रम लावणे. वस्तुस्थिती पाहिली तर, महात्मा गांधी हे देवाला मानत होते; दाभोलकर, पानसरे मात्र ते मानत नव्हते. त्यामुळे त्यांची हत्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी केली असे म्हणणे विरोधाभासाचे ठरते. 1999 च्या एनडीए सरकारची आघाडी ही कॉमन मिनीमम प्रोग्रॅमवर आधारित होती. त्याप्रमाणे केवळ अहिंसा या कॉमन मिनीमम विचारांवर गांधी-दाभोलकर-पानसरे यांचा वारसा आहे. राहता राहिला प्रश्‍न गांधी हत्येचा. नथुराम गोडसेने बापूंना मारले ते शेकडो कार्यकर्त्यांसमोर. मात्र दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणारे मारेकरी अज्ञात आहेत. त्यांनी असा कोणताही पुरावा सोडलेला नाही की आम्ही अमुक अमुक एका विचाराचे आहोत. त्यामुळे दाभोलकर किंवा पानसरे यांची हत्या हिंदुत्वावाद्यांनी केली हा एक जावईशोध म्हणावा लागेल.  
हत्या कोणाचीही असो, तिचे समर्थन कदापिही करता येत नाही! मात्र, कोणत्याही सबळ पुराव्याअभावी एखाद्यावर आरोप करणेदेखील गैर आहे. 

याशिवाय आणखी एक प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया तर दाभोलकरांना संकुचित करणारी, त्यांना देवत्व बहाल करणारी ठरते,  ती अशी... 
’सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला. आज रात्री (20 फेब्रुवारी) त्यांचे निधन झाले आहे. दीड वर्षापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळ्या घालून मारण्यात आले. अजून त्यांचे मारेकरी सापडले नाहीत तोच पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि आता त्यांचे निधन झाले. का मारले या दोघांना? तर ते लोकांना शहाणे करत होते. त्यामुळे हितसंबंधित लोकांनी त्यांची हत्या केली. गांधी मारले, दाभोलकर मारले आणि आता अण्णा. अजून अनेकजण लिस्टवर आहेत. आमचाही कधी नंबर आहे. यात विशेष काही नाही, पण मानवतेच्या शोषणमुक्तीचा लढा आम्ही असाच चालू ठेवू हीच या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’

यावर मी त्या जबाबदार अनुयायी पत्रकार मित्राला सांगितले, ’मित्रा, माझ्या माहितीप्रमाणे डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या मारेकर्‍यांचा अजून तपास लागलेला नाही.’

त्यावर तो म्हणाला, ’आमचा माणूस मारला तरी अजून तुम्हाला काय म्हणायचे आहे?’

मी म्हणालो, ’दाभोलकर, पानसरे हे सर्व समाजाचे होते. त्यांच्यावर कोणीही हक्क प्रस्थापित करू शकत नाही मित्रा.’

तो म्हणाला, ’पुरोगामी म्हणजे आम्ही! या अर्थाने ती आमची माणसे आहेत. एवढे तुला निश्‍चित समजत असेल, असे मला वाटले होते. असो आता ही चर्चा करण्याची वेळ नाही, पण...’

पुढे संवाद संपला, मात्र वरील संवादातून लक्षात येईल की, डॉ. दाभोलकर, पानसरे यांना त्यांच्या अनुयायांनी किती संकुचित केले आहे. याउलट माझे दुसरे मित्र हर्षल लोहकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गेल्या पाच दिवसापासून पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदीराजवळील पुलावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे उपोषणकर्ते मित्र खर्‍याअर्थी दाभोलकर, पानसरे यांच्या विचारांचा वारसा पुढे रेटत आहेत. त्यांच्या कार्यास शुभेच्छा आहेत.

दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणारे कोण आहेत? ते कोणत्या संघटनेचे, विचारांचे आहेत? ते अद्याप मला माहीत नाहीत, पण त्यांच्या विचारांचे मारेकरी त्यांचे हे प्रतिक्रियावादी अनुयायीच आहेत हे मात्र नक्की.

सागर सुरवसे, पुणे
9769179823

Follow On Twitter- @sagarsurawase 

Tuesday 17 February 2015



 दिल्लीच्या अभूतपूर्व निकालानंतर मोदींची लाट ओसरली असे अनेक अराजकीय विश्‍लेषक सांगत सुटले आहेत. गंमत म्हणजे लोकसभेच्या विजयानंतर हेच विश्‍लेषक मोदींची लाट आहे हे मानायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांचे विश्‍लेषण कोणत्या प्रतीचे आहे हे लक्षात येते. लेखाचा मूळ विषय आहे मोदींचा बारामती दौरा. विधानसभेच्या प्रचारावेळी मोदींनी बारामतीकरांना आवाहन केले होते की, ’’पवार काका-पुतण्याचे साम्राज्य खालसा करा. बारामतीला गुलामीतून मुक्त करा.’’ मात्र अजून विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच मोदींनी त्याच साम्राज्याचे कौतुक सुरू केले आहे. त्यानंतर समाज माध्यमातून (सोशल मीडियावरून) मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली. मात्र असं असलं तरी मोदींनी पवारांच्या केलेल्या कौतुकाकडे अनेक अंगांनी पाहावे लागेल.
गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपमधील वाक्युद्ध चांगलेच रंगले आहे. त्यामुळे सेना-भाजपमध्ये फारसं काही अलबेल नाही हे लक्षात येतं. सेनेलाही ते अलबेल रहावे असं वाटत नाही, कारण लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. भाजपसोबत महापालिका निवडणुका लढलो तर आपल्याला त्याचा फटका बसणार या असुरक्षिततेतून सेनेची ही खेचाखेची सुरू आहे. तीच गोष्ट भाजपच्या बाबतीत आहे. सेनेवरील आपला लगाम शाबूत ठेवण्यासाठी भाजपला आणखी एका पक्षाची गरज आहेच. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीशी आपला घरोबा राखला आहे. 
याशिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मदतीने सेनेची मुंबईतील रसद बंद करण्याचा भाजपच्या चाणक्यांचा विचार दिसत आहे. त्यासाठीच हा घरोबा मोदी करत आहेत. विधानसभेचा इतिहास पाहाता ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व परिप्रेक्षेतून पंतप्रधानांच्या बारामती दौर्‍याकडे पाहिले तर अनेक गोष्टी लक्षात येतात.
मोदींनी बारामती दौर्‍यात पवारांची स्तुती केल्याच्या बातम्या सर्वच माध्यमातून झळकल्या. समाज माध्यमातून तर मोदींवर फारच टीकेची झोड उठवली गेली. ही टीका होणे साहजिक आहे कारण, विधानसभेवेळी मोदींनी राष्ट्रवादीला ’नॅशनल करप्ट पार्टी’ असे संबोधले होते. सत्तेत येताच मोदींनी याच करप्ट पार्टीच्या प्रमुखांवर स्तुती सुमने उधळली. बारामती दौर्‍यात मोदी म्हणाले, ’’ जिथे मती आणि गती असेल तिथे प्रगती असते. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्वाचे मानतो. पक्षापेक्षा देश मोठा आहे.  आमचे मार्ग वेगळे असले तरी विकास हेच आमचे लक्ष्य आहे. सरकार कसं चालवायचं? राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय कसा ठेवायचा? या बाबतीत मी पवारांकडून धडे घेत आलो आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना शरद पवार हेच माझे एकमेव दुवा होते. महिन्यातून दोन-तीनवेळा आमचं बोलणं व्हायचं. केंद्रात असताना त्यांनी गुजरातचे अनेक प्रश्‍न सोडवले आहेत.’’ 
मात्र असं असली तरी, ''गेल्या दहा वर्षात जे काम झालं नाही ते काम करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचा'' चिमटाही त्यांनी पवारांना काढला. मोदी पुढे म्हणाले, ’’वाद आणि संवाद हे लोकशाहीचे सौंदर्य आहेत.’’ या सर्व स्तुती सुमनांवरून मोदी राजकारणात वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे, केजरीवाल यांच्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही मोदींनी खुल्या मनाने ट्विटरवरून केजरीवालांचे अभिनंदन केेले. त्यांना भेटीचे आमंत्रण देऊन त्यांची भेट घेतली. मात्र असं असलं तरी भारतीय समाज आजही राजकारणाच्या बाबतीत या गोष्टी मान्य करायला तयार नाही. खरं तर भारतीय समाजासाठी ही एक संधी आहे, राजकारणात समन्वय येऊ देण्याची. कारण जोवर राजकीय नेत्यांमध्ये विकासाच्या बाबतीत एकवाक्यता होत नाही, तोवर देशाचा विकास शक्य नाही. मोदींचे हे राष्ट्रप्रेम, समन्वयाचे राजकारण केवळ मुंबई महापालिका जिंकण्यापूरतं मर्यादीत राहू नये हीच अपेक्षा. अन्यथा लोक म्हणतील, पवारांची मती, मीडियाची गती आणि मोदींची अधोगती...  
(प्रसिद्धी-  सा. चपराक)

सागर सुरवसे
9769179823/ 9665899823
Follow- @sagarsurawase
Email- sagar.suravase@gmail.com

Tuesday 3 February 2015

अतिशय तल्लख बुद्धीमत्तेच्या दत्तप्रसाद दाभोलकर यांनी विवेकानंदांच्या नावावर स्वत:चे विकृत विचार पसरवण्याचा खटाटोप सोलापुरात २४ ते २६ जानेवारी या काळात झालेल्या व्याख्यानमालेतून केला. भंपक आणि खोटारडेपणा करून विवेकानंद विचारांत भेसळ करू पाहणार्‍या दाभोलकर यांना उघडे पाडणारा हा माझा दै. तरुण भारतच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला लेख... 

परिवर्तन अकादमी नावाच्या संस्थेने या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेले स्वामी विवेकानंदांचे समग्र वाङमय हे एकांगी आणि दत्तप्रसाद दाभोलकर यांनी लिहिलेले ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ हे एकमात्र पुस्तकच सर्वसमावेशक अशी भूमिका आयोजकांनी पहिल्याच दिवशी घेतली. विवेकानंदांच्या पुस्तकांचा स्टॉल लावण्यास कार्यक्रमस्थळी मज्जाव करण्यात आला. दाभोलकर यांनी तिन्ही दिवस आपल्या व्याख्यानाची पुष्टी करण्यासाठी मठाने प्रकाशित केलेल्या १० खंडाचा आधार घेतला. लोकांना मूळ वाङमयापासून दूर ठेवायचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे सूर्य उगवू नये म्हणून कोंबडी झाकण्यासारखे झाले. होय, हेच ते स्वयंघोषित पुरोगामी.
 परिवर्तन अकादमी, जमात ए इस्लाम वगैरे संस्थांनी मिळून समविचारी सभा या नावाने अनेक उपक्रम यापूर्वी घेतले आहेत. यावेळी दाभोलकर यांच्या विवेकानंदांवरील व्याख्यानमालेतून इस्लामचा प्रचार होत असताना सभागृहासमोरील मैदानात मोफत कुराण वाटप होणे, संशय गडद करणारे आहे.


२६ जानेवारी रोजी दाभोलकर सोलापुरातल्या व्याख्यानात सांगत होते,‘विवेकानंदांनी इस्लामचा गौरव केला आणि हिंदू धर्माला मूर्ख म्हटले.’दाभोलकर प्रवृत्तीच्या दुर्दैवाने त्याच वेळी देशाच्या राजधानीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सांगत होते, ‘विवेकानंदांनी अमेरिकेला सर्वप्रथम हिंदुत्व आणि योग यांची ओळख करून दिली.’
तीन दिवसांच्या व्याख्यानांतून दाभोलकर यांनी स्वामी विवेकानंदांना आपल्या कल्पनेतील समाजवादी अर्थात हिंदुत्वविरोधक ठरवण्याचा प्रयत्न केला. यासाठी विवेकानंदांच्या तोंडी स्वत:चे विचार घुसडण्याचा प्रमादही दाभोलकर यांनी केला. विवेकानंदांनी आपण समाजवादी असल्याचे सांगितले हे खरेच आहे. 

विवेकानंदांनी हिंदू धर्मातील वाईट रूढींवर प्रहारही केले. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मातील चांगल्या बाबींचे कौतुकही केले. हिंदू धर्म अधिकाधिक चांगला व्हावा, हा उद्देश त्यामागे होता. परंतु दाभोलकर यांनी मात्र आपल्या संपूर्ण व्याख्यानातून जाणवेल अशा रीतीने हिंदू धर्मावर टीका आणि इस्लामचा गौरव केला. यासाठी त्यांनी विवेकानंद ग्रंथावली खंड ३ मधील एक संदर्भ दिला. ६ सप्टेंबर १८९३ रोजी विवेकानंद ‘हिंदुस्थानातील मुसलमानी राजवट’ या विषयावर बोलले, असा संदर्भ आहे. काय बोलले याची माहिती उपलब्ध नाही पण दाभोलकरांनी मात्र तर्कट मांडला की, ‘इस्लामी राजवटीचे भारताला योगदान असाच विषय विवेकानंदांनी मांडलेला असला पाहिजे.’

येथे आपण विवेकांनंदांचे इस्लामविषयीचे मत साधार पाहिले पाहिजे, की जे दाभोलकर यांनी दडवले. हिंदूने चांगला हिंदू होण्याचा, मुसलमानाने चांगला मुसलमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदूने मुसलमान किंवा मुसलमानाने हिंदू होण्याची आवश्यकता नाही, असे स्वामी विवेकानंद आवर्जून सांगायचे. याचवेळी तलवारीच्या जोरावर जगाला मुसलमान करणार्‍या प्रवृत्तीवद्दल विवेकानंदांनी हिंदूंना सावधही केले आहे. पासाडेना, कॅलिङ्गोर्निया येथील एका भाषणात स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘प्रत्येक युगात, प्रत्येक राष्ट्रात जे थोर पुरुष आणि स्त्रिया होऊन गेल्या त्यांना आदराने वंदन करा. चैतन्याची - दिव्यत्वाची साक्षात अनुभूती जेव्हा येते तेव्हा मन विशाल होते. सर्वत्र त्या एकाच ईश्वराचे प्रकाशमय दर्शन होऊ लागते. मुसलमानांच्या मनात ही धारणा विकसित झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यात धर्मांधता आणि कडवेपणा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची घोषणा हीच की, ‘अल्ला एकच आहे आणि महंमद हाच त्याचा प्रेषित आहे.’ एवढेच सत्य. यावेगळे जे जे आहे ते केवळ त्याज्यच नव्हे, तर चिरडून नष्ट करून टाकले पाहिजे. जे कोणी काङ्गर आहेत त्यांच्या कत्तली केल्या पाहिजेत. या उपासनापद्धतीहून वेगळ्या उपासनापद्धती तोडून मोडून ङ्गेकून दिल्या पाहिजेत. याहून वेगळे सांगणारा प्रत्येक धर्मग्रंथ जाळून टाकला पाहिजे. अशी ही धर्मांधता आहे. प्रशान्त महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत या धर्मांधांनी पाचशे वर्षे रक्ताचे पाट वाहविले ! इस्लाम हा असा आहे !’’ 
(समग्र वाङ्‌मय, खंड ४)

आकाशातून पडणारे पाणी शेवटी सागराला जाऊन मिळते त्या प्रमाणे कोणत्याही ईश्‍वराची केलेली उपासना एकाच ईश्‍वरापर्यंत पोहोचते, असे हिंदू धर्म सांगतो. सर्वच धर्म सत्य आहेत यावर हिंदू धर्मियांचा विश्‍वास आहे. ही विचारधारा अर्थात वेदान्त जगात शांती आणू शकेल आणि वेदान्त हाच भावी जगासाठी उपयुक्त असेल असे विचार स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेच्या जगप्रसिद्ध भाषणांतून मांडले. परंतु दाभोलकर यांनी येथेही चलाखी केली. सर्व धर्मांवर आधारित धर्माची संकल्पना विवेकानंदांनी मांडल्याचे त्यांनी खोटेच सांगितले. 

इस्लामच्या आक्रमणाने स्वत:चा धर्म वाचवण्यासाठी पळून आलेल्या पारसी लोकांना हृदयाशी धरणार्‍या आणि ख्रिस्ती लोकांच्या अत्याचाराने देशोधडीला लागलेल्या यहुदी लोकांना त्यांच्या धर्मासह आश्रय देणार्‍या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी अभिमानाने सांगितले, याचा साधा उल्लेखही दाभोलकर यांनी केला नाही.
संन्याशांनी आपल्या हातात गीता, कुराण आणि बायबल घेऊन आध्यात्म आणि विज्ञानाचे शिक्षण देत फिरावे, असे विवेकानंदांनी सांगितल्याचे दाभोलकर यांनी सांगितले. 
परंतु, विवेकानंदांचे मूळ उद्धरण पुढीलप्रमाणे आहे, ‘‘शेकडो समर्पित संन्यासी आपल्या देशात धर्मशिक्षण देत गावोगाव ङ्गिरत आहेत. त्यांच्यातील काहींनी भौतिक शिक्षणसुद्धा दिले पाहिजे. ह्या संन्याशांनी केवळ अध्यात्म-विद्यांचेच नव्हे, तर ऐहिक विद्येचे दान करीत घरोघर गेले पाहिजे. ‘ॐ’ हे सर्व पंथीयांना वंद्य असे प्रतीक आहे. त्या ॐचीच प्रतिष्ठापना या मंदिरात करू. जर एखाद्या पंथाला ‘ॐ’ हे प्रतीक स्वीकारावे असे वाटत नसेल, तर तो पंथ हिंदू नव्हेच!... इत्यादी.’’

दाभोलकर यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले की विवेकानंदांनी उपनिषदांची खिल्ली उडवली. खोटारडेपणाचा हा कळच आहे. कारण विवेकानंदांनी उपनिषदांना सामर्थ्याचा अक्षय्यकोष असल्याचे म्हटले आहे. विवेकानंदांचे शब्द आहेत, ‘‘शक्ती ! शक्तीची उपासना’ हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. हा एकच संदेश मी आयुष्यभर शिकत आलो आहे. ‘हे बंधो, दुर्बल बनू नको ! शक्तीची उपासना कर!
उपनिषदे म्हणजे सामर्थ्याचा अक्षयकोषच आहेत. सर्व विश्व गदगदा हलवील, असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. सारे विश्व त्यांच्या संदेशाने चैतन्यमय होईल, समार्थ्यमय होईल.
विविध वंश, जाती आणि पंथ यांच्यात जे दीनदुबळे आहेत त्यांच्यात उपनिषदांचा ललकार सामर्थ्य ओतील. त्यांना मुक्त आणि निर्भय करील. स्वातंत्र्य - शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्वातंत्र्य हे उपनिषदांचे प्राणसूत्र आहे.’’
माणसांनी धर्मांतर केले तर ते मनावर घेऊ नका, असे विवेकानंदांचे सांगणे असल्याचे दाभोलकर सांगतात. पण हे सत्य नाही.
हिंदू समाज सहिष्णू आहे. परंतु जगाच्या पाठीवर त्याचे अस्तित्व अबाधित राहिले तर या सहिष्णूतेला अर्थ आहे. संपूर्ण जग माझ्याच धर्माचे झाले पाहिजे या एकांगी विचारातून जगभर सुरू असलेल्या धर्मांतराचा धोका स्वामी विवेकानंदांनी शंभर वर्षांपूर्वीच ओळखला होता.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘हिंदूत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या केवळ एकाने कमी करतो, एवढेच नव्हे तर शत्रूची एकाने वाढवितो.’’
सिन्हाजी नामक शिष्यासोबतचा स्वामी विवेकानंदांचा संवाद खूपच बोलका आहे. ‘‘सिन्हाजी, तुमच्या आईचा कुणी अपमान केला तर तुम्ही काय कराल ?’’
‘‘मी त्याच्यावर तुटून पडेन स्वामीजी, आणि चांगला धडा शिकवीन त्याला.’’
‘‘बरोबर बोललात. तुम्ही आपल्या धर्माला आईइतकेच मानत असाल, तर कोणाही हिंदू बांधवाने ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला तर ते पाहून तुम्हाला मरणप्राय दु:ख व्हायला हवे. हे तर प्रतिदिनी घडताना तुम्ही पाहात आहात आणि त्याचे काहीच सोयरसुतक तुम्हाला नाही ? कुठे गेली तुमची श्रद्धा ? कुठे गेली तुमची देशभक्ती ? रोज ख्रिस्ती प्रादी तुमच्या तोंडावर तुमच्या धर्माची निंदा करतात. पण तुमच्या कोणाचेच रक्त तापत कसे नाही ? तुम्ही हिंदुधर्माच्या रक्षणासाठी उभे का राहात नाही ?’’

आत्मविस्मृत झालेल्या हिंदूंमधील स्वाभिमान जागवण्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘माझे हे शब्द स्मरणात असू द्या : ‘हिंदू’ हा शब्द उच्चारताच अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात. ‘मी हिंदू आहे’ असे जो बांधव म्हणतो तो लगेच तुमचा परमप्रिय, परमनिकट आप्त झाला पाहिजे. मग तो कोणत्याही देशातून आलेला असो. तो तुमची भाषा बोलत असो वा अन्य भाषा बोलत असो. कोणत्याही हिंदूची वेदना स्वत:च्या वेदनेइतकीच तुमचे हृदय व्यथित करत असेल तरच तुम्ही ‘हिंदू’ आहात.’’
‘‘आपण हिंदू आहोत. ‘हिंदू’ या शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित करावयाचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळामध्ये सिंधूच्या एका बाजूला राहणारे ते हिंदू इतकाच त्याचा अर्थ होता. जे आपला द्वेष करीत आले त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिकटविला असेल. पण त्याचे काय ! हिंदू या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा; अथवा जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडविले गेलेले आहे, जे दैन्यवाणे आहे अशाचा बोध व्हावा हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकांत अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊया.’’

ख्रिश्‍चन मिशनर्‍यांची गंभीर दखल
स्वामी विवेकानंदांनी युरोप आणि अमेरिकेत अनेक चर्चमध्ये व्याख्यानेे दिली. येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या मानवी मूल्यांचा गौरव केला. जगाच्या पाठीवर आजवर झालेल्या सर्व महापुरुषांमध्ये मानवी विकासाचा समान धागा असल्याचे दाखवून दिले. परंतु याच वेळी संपूर्ण जगाला ख्रिश्‍चन करण्याच्या धर्मवेडाने पछाडलेल्या मिशनर्‍यांवर प्रहार करायलाही ते मागेपुढे पाहिले नाहीत. बायबलमधील उदात्त तत्त्व सांगितले त्याप्रमाणे बायबलमधील ‘मनुष्य पापी आहे’ असे सांगून माणसाला मेंढी बनवणार्‍या या शिकवणीचा धिक्कारही केला. माणसाला पापी म्हणणे हेच पाप असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात येऊन हिंदूंना बाटवून ख्रिस्ती करणार्‍या पाद्य्रांविषयी स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘येशू भारतात आला आहे आणि आकाशातल्या बापाचा आदेश लौकरच ङ्गळाला येणार आहे !’ असे डंके पिटणार्‍यांनो, तुम्ही उघड्या कानांनी ऐका. जीझस्‌ही इथे आलेला नाही आणि येहोवा त्याहून आलेला नाही. ते येण्याची सुतराम शक्यताही नाही. आपापल्या चुली सांभाळताना त्यांना इथे यायला उसंत देखील होणार नाही !
इथे तो पुरातन शिवसम्राटच पूर्ववत् आसनस्थ आहे. रुधिरप्रिया कालीमातेचीच इथे समारंभपूर्वक पूजा होत आहे. तो यशोदानंदन गोपाल आपली मोहक मुरली वाजवितो आहे. या शिवाने एकदा वृषभावर आरूढ होऊन डमरूचा रुद्रनाद करीत सुमात्रा, बोर्निओ, सेलेबर, जपानपासून सैबेरियापर्यंत आपली मुद्रा उमटविली होती. आजही उमटवीत आहे. कालीची पूजा चीन आणि जपानमध्ये आजही चाललेली आहे. ख्रिश्‍चनांनी तिचेे रूपांतर माता मेरीमध्ये केले आहे. ख्रिस्तमाता म्हणून ते तिची पूजा करतात.
हिमालयाची ती उत्तुंग शिखरे पाहा ! उत्तरेला शिवाचे निधान कैलास आहे. दहा तोंडाचा आणि वीस हातांचा महाबलाढ्य रावणसुद्धा ते शिवसिंहासन हलवू शकला नाही. मग बिचार्‍या मिशनर्‍यांचा काय पाड ? या भरतभूमीत भगवान शिवांचा डमरू सतत रुद्रनाद करीतच राहील. कालीमातेला पशुबली दिले जातच राहतील आणि गोपालकृष्ण त्याची भुवनमोहिनी मुरली वाजवीतच राहील ! हिमालयाइतकेच ते दृढ अचल आहेत. ख्रिस्ती किंवा आणखी कोणा धर्मप्रचारकांनी आकशपाताळ एक केले तरी ते त्यांना झळ पोहचू शकणार नाहीत.
तुम्हाला जर ही दैवते सोसत नसली तर रामराम ! तुमच्यासारख्या मूठभर करंट्यांसाठी काय या देशाने दम उखडावा आणि मुलखाचे नीरस जीवन पत्करावे ? एवढे जग तुमच्यापुढे पडले आहे. शोधा की तुम्हाला सोयीचे कुरण मनमुक्त चरायला ! पण हे मूठभर करंटे असे गुण्यागोविंदाने जातील थोडेच ! तसे करायलाही हिंमत लागते. ते शिवाच्या या भूमीतच पोटे भरून घेतील, पण शिवाचीच बदनामी करतील आणि कुठल्यातरी परक्या प्रेषिताचे गोडवे गातील !’’

  सारांश : सर्व धर्मांना सामावून घेणारी विचारधारा जगात फक्त हिंदू धर्माकडेच आहे. सर्व धर्म सत्य आहेत, असा विचार फक्त हिंदू धर्मच मांडतो. आपल्या धर्मातील दोष आपण दूर करू. पण यासाठी हिंदू धर्मावर कोणी आघात करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, अशी ठाम भूमिका विवेकानंदांची होती. हिंदू धर्म नष्ट करण्याची भावना अन्य धर्मीय बाळगत असतील तर मुकाट्याने अपामान सहन करा असे विवेकानंदांनी सांगितलेले नाही. परंतु, दाभोलकर यांनी आपल्या व्याख्यानातून हिंदूंचा तेजोभंग करून इस्लाम आणि ख्रिश्‍चन धर्माला वरचढ दाखवण्याचा विकृत प्रयत्न विवेकानंदांचे नाव घेऊन केला. दाभोलकरांचा खोटारडेपणा वेळीच उघड करणे गरजेचे वाटल्यानेच हा लेखनप्रपंच केला.

सागर सुरवसे
९७६९१७९८२३

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!