Sunday 10 May 2015




 साधारणपणे मराठी वाचक हा मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषेतील वृत्तपत्र, नियतकालिकं वाचण्याच्या फंदात पडत नाही. रविवार पुरवणी किंवा साप्ताहिक वा मासिक या पुढे तो फारसा सरकत नाही. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांवर वृत्तपत्रातील बातम्या किंवा फारतर एकादा लेख यापुढे त्याचे वाचन जात नाही. त्यामुळे त्याचे वाचन हे एकांगी  होण्याची दाट शक्यता असते. गेल्या महिनाभरात अनेक प्रश्न चर्चेला आले. त्यात प्रामुख्याने अरविंद केजरीवाल यांचा विजय आणि विजयानंतर आलेल्या मग्रूरीतून पक्षातील उभी फूट अशा अनेक रंजक घडामोडी पहायला मिळाल्या. यावर मराठीत फारशी काही साधक- बाधक चर्चा झाल्याचं वाचण्यात आलं नाही. मात्र या संदर्भात हिंदी भाषेतील अग्रगन्य असलेल्या 'पांचजन्य' या साप्ताहिकामध्ये एक सुंदर लेख वाचनात आला. याशिवाय 'डॉ. हेडगेवार और गांधी' हा एक माहितीत भर टाकणारा व महत्वपूर्ण लेख वाचनात आला. तसंच बंगालमधील एका विज्ञानवादी लेखकाची मुस्लिम कट्टरतावाद्यांनी केलेल्या हत्येबाबतीतला एक लेखवजा माहितीही 'पांचजन्य'च्या अंकात देण्यात आली आहे. हे तीनही लेख वाचकांनी जरूर वाचायला हवेत. एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू वाचल्याने आपले एक विशिष्ठ मत तयार होण्यास मदतही होते.
अनेककाळ सत्तेत असलेल्या काॅंग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर दोनवेळा बंदी घातली. यापैकी सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या हत्येला संघच जबाबदार असल्याचा कांगावा करत बंदी घालण्यात आली होती. मात्र याच गांधींनी रा. स्व. संघ आणि त्याचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांच्या कार्यावर स्तुती सुमने उधळली होती. डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्या भेटीबाबतचा एक सुंदर लेख यात प्रकाशित करण्यात आला आहे. या लेखातून अनेक गोष्टींची स्पष्टता होते. दोन महापुरूष जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्यात नक्की कोणत्या विषयावर बोलणी होते? याची उत्सुकता अनेकांना असते. 'पांच्यजन्य'मधील या लेखामुळे ती उत्सुकता पूर्ण होते.

1934 साली महात्मा गांधी वर्ध्यामध्ये काहीकाळ मुक्कामी होते. या दरम्यान ते राहत असलेल्या सत्याग्रह आश्रमाजवळच संघ स्वयंसेवकांचे शिबिर होते. गांधीजी रोज पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडत. त्या दरम्यान त्यांची नजर या स्वयंसेवकांकडे गेली. 22 डिसेंबर रोजी शिबिराचे उद्घाटन झाले. त्यावेळी गणवेषातील दीड हजार युवक आणि गृहस्थी व्यक्ती बॅंडच्या तालावर एकसारखे संचलन करत होते. त्यांचा हा सर्व कार्यक्रम गांधीजी आपल्या आश्रमातून एकटक पाहत होते. स्वयंसेवकांची ही शिस्त पाहून, या शिबिराला भेट देण्याची आपली इच्छा असल्याचेे सहकारी महादेवभाई देसाई यांच्याजवळ सांगितले. त्यानंतर देसाई यांनी वर्धा जिल्ह्याचे संघचालक अप्पाजी जोशी यांच्याशी पत्रव्यवहार करून, महात्माजींची या शिबिराला भेट देण्याची इच्छा आहे. त्यामुळे भेटीसाठी आपण उचित वेळ सांगावी अशी विनंती केली.
त्यानंतर 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता गांधीजी शिबिरस्थळी पोहोचले. त्यांनी शिबिराची संपूर्ण माहिती घेतली. संचलन, खेळ याचेही बारकाईने निरीक्षण केले. स्वयंसेवकांची ही शिस्त आणि अनुशासन पाहून गांधीजी अप्पाजींच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, " मी खरंच खूप खूष झालोय. संपूर्ण देशभरात इतकं प्रभावी दृश्य यापूर्वी मी केव्हाच पाहिलं
 नाही.''                                                     
महात्माजींनी हे पाहिल्यानंतर जाण्यापूर्वी संघाचे मुख्य कोण आहेत याची विचारणा केली. त्यावर अप्पाजी जोशींनी सांगितले, पूज्यनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार! त्यावर गांधीजी म्हणाले, ''मला त्यांना भेटायला आवडेल.' त्याच्या दुसर्या दिवशी डॉ. वर्ध्यातील शिबिरात आले. त्यांना गांधीजी येऊन गेल्याची माहिती देण्यात आली व त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचही सांगण्यात आल. त्यानुसार सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी रात्रीच्या जेवणानंतर गांधीजींची भेट घेतली. पुण्याचे डॉ. अण्णासाहेब भोपटकर आणि अप्पाजी जोशीही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
डॉ. हेडगेवार आणि गांधीजी यांची जवळपास तासभराची भेट झाली. या भेटीत गांधीजींनी संघाच्या शिस्तीचे रहस्य, कमी खर्चात जेवणाची व्यवस्था कशी करता?  याशिवाय डॉक्टरजी आपण अनेक वर्ष कॉंग्रेसमध्ये होतात, मग संघटनेत राहून हे काम का नाही केले? स्वयंसेवकाबाबत तुमची काय कल्पना आहे? असे अनेक प्रश्नही गांधींनी हेडगेवारांना केला. त्याला डॉक्टरांनी दिलेली उत्तरही तितकीच परखड आहेत. त्यामुळे हा लेख  वाचकांनी आवर्जून वाचावा.
        दुसरा लेख म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या वाणी आणि कृतीमधील विरोधाभास विशद करणारा आहे. महत्वाचं म्हणजे, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांना केजरीवाल यांनी कशापध्दतीने बाजूला सारले याचे उत्तम विश्लेषण या लेखात करण्यात आले आहे. केजरीवाल यांचे आजी, माजी सहकारी मयंक गांधी, आशुतोष, अंजली दमानिया, शाजिया इल्मी, किरण बेदी, 'आप'चे खासदार भगवंत मान या सर्वाचे वक्तव्य लेखाच्या सुरूवातीलाच देण्यात आले आहेत. त्यामुळे केजरीवाल यांचा ढोंगीपणा समजण्यास मदत होते.
या लेखात पक्षातील अनेक महत्वाचे आणि कळीचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
• अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पद आणि पक्षाचे संयोजक पद स्वत:कडे ठेवणे योग्य आहे का? हे पक्ष तत्त्वाच्या विरोधात नाही का?
• एक व्यक्ती एक पद या तत्त्वाचे काय?
• पक्ष आणि सरकार एकाच व्यक्तीच्या भोवताली फिरत असेल तर मग इतर पक्ष आणि आप यात काय फरक राहिला?
• दिल्ली विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 23 व्यक्तिंना उमेदवारी का देण्यात आली?
• डझनभर लोकाना पैसे घेऊन टिकीट दिल्याचा आरोप होत असताना, पक्ष जर तत्त्वावर चालणारा असेल तर याची चौकशी का होत नाही?
• निवडणुकीआधी 'आप'ने कॉंगेस आणि भाजप पक्षांतर्गत माहितीचा अधिकार लागू करण्याची मागणी केली होती. मात्र आप पक्षात हा नियम का लागू केला जात नाही.
• पक्षाच्या निर्णयात पारदर्शकतेचा अभाव का ? तसेच पक्षातील निर्णय हे गुपचुपपणे व काही लोकांशीच चर्चा करून का केले जातात?
• योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीतून हकालपट्टी का करण्यात आली? याबाबतीत खासदार भगवंत मान यांचे वक्तव्यही याचे उत्तर देऊन जाते. याशिवाय जातीयवादाचे एक उदाहरणही या लेखात देण्यात आले आहे.
वरील सर्व प्रश्नांचे उत्तर या लेखात सविस्तरपणे व पुराव्यानिशी देण्यात आली आहेत. अखेर काय तर, सत्ता चांगल्या व्यक्तिला कशी भ्रष्ट,  स्वार्थी व नैतिकताहीन बनवते याचे जिवंत उदाहरण या लेखातून आपल्याला पाहायला मिळते.

याशिवाय 'पांचजन्य'मधील आणखी एक माहितीवजा लेख मुस्लिम कट्टरतावादाचा पर्दाफाश करतो. एक प्रसिध्द विज्ञानवादी बंगाली लेखक बंगलादेशातील एका राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मुस्लिम कट्टरतावाद्यांनी या लेखकाची चाकूने भोसकून हत्या केली. अविजीत रॉय अस या लेखकाचं नाव आहे. त्यांच्या हत्येनंतर मुलगी तृषा अहमद हीने आपल्या फेसबूक वॉलवर आपल्या वडिलाच्या हत्ये बाबतची माहिती लिहिली आहे. तसंच तिने आवाहन केले आहे की, अशा मुस्लिम कट्टरतावादाला न घाबरता माझी ही आर्त हाक जगभर ऐकू जावी, अशी इच्छा ती व्यक्त करते. त्यावर रॉय यांच्या हत्येच्या निषेधार्त  बंगाली लेखिका तस्लिमा नसरीन, बंगलादेशी ब्लॉगर अरीफुर्रहमान, आसिफ मोहिनुद्दिन या लेखकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी व समाजातील, देशातील, इतिहासातील वा जगभरातील दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी साप्ताहिक 'पांचजन्यमधील हे लेख आवर्जून वाचलेच पाहिजेत. 
http://www.panchjanya.com/

 ( प्रकाशित लेख : 'विवेक विचार' मासिक, एप्रिल २०१५ ) 

सागर सुरवसे, 
पुणे
9769179823 / 9665899823
Follow on twitter: @sagarsurawase

0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!