Saturday 2 May 2015




         भ्रष्टाचाराचे सप्तरंग दाखविणारा अक्षयचा 'गब्बर' आवर्जून पाहा...    

  
अक्षय कुमार नेहमीच काहीतरी हटके, पण देशप्रेमाशी निगडीत असे विषय घेऊन समाजासमोर येतो. 'हॉलीडे', 'बेबी' हे त्या पठडीतलेच काही चित्रपट. हे दोन्ही चित्रपट पाहण्यासारखेच आहेत. त्यात आता 'गब्बर'चीही भर पडली आहे. भविष्यात जेव्हा केव्हा अक्षयच्या कारकिर्दीचा विचार केला जाईल किंवा त्याच्या कामाचे मूल्यमापन करायचे झाल्यास, त्यात या तीनही चित्रपटांची दखल घ्यावील लागेल. थोडी अतिशयोक्ती वाटेल पण, हे चित्रपट वगळले तर माझ्यालेखी  अक्षयचे काम निव्वळ मनोरंजनच ठरेल.
'गब्बर'मध्ये अक्षयने जो विषय हाताळला आहे, ते इतरांनीही हाताळले आहेत. मात्र अक्षयने ज्या पध्दतीने तो हाताळला ते केवळ लाजवाबच आहे. 'गब्बर'चे वैशिष्ठ्य म्हणजे, हा सिनेमा अगदी सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे. दैनंदिन जीवनात सामान्य लोकाना शासकीय काम करून घेताना ज्या समस्या येतात, भ्रष्टाचाराच्या बजबजपूरीत त्यांची होणारी ससेहोलपट यात चपखलपणे दाखविण्यात आली आहे. त्यामुळेच हा चित्रपट पुन्हा एकदा पहावासा वाटतो.
'गब्बर'मध्ये तहसीलदार कार्यालय, पोलीस खाते तसेच मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील भ्रष्टाचाराचे स्वरूप दाखविण्यात आले आहे. या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील भ्रष्टाचाराची पोलखोल इतक्या योग्य पध्दतीने केली आहे. त्यामुळे या चित्रपटात जान येते.

 
कोणत्याही साहित्याचा, चित्रपटाचा उद्देश हा 'मनोरंजनातून प्रबोधन करणे' हा असायला हवा. नव्हे नव्हे तो असलाच पाहिजे, मात्र दुर्दैवाने आपल्याकडे ते फार व्यापक प्रमाणात घडत नाही. अर्थात घडत नव्हते. सलमान खानचा 'जय हो' असेल किंवा अजय देवगणचा 'सिंघम' अशा चित्रपटामुळे बॉलीवूडमध्ये एक जबाबदारीची जान आल्याचे दिसून येते. साधारणपणे आपल्याकडे प्रेम, खून, दरोडे, अशांचाच भरमसाट मारा पहायला मिळत असतो मात्र अलीकडच्या काळात या आघाडीच्या कलाकारांनी मात्र जबाबदारीची जाणीव करून देणारे चित्रपट निर्माण करून समाजाला एक विधायक दिशा देण्याचे कार्य केले आहे असेच वाटते.
"देशाप्रेमाने ओतप्रोत भरलेले शंभर युवक मला द्या, मी देशाचे चित्र बदलेन" हे स्वामी विवेकानंदांचे विचारधन 'गब्बर' चित्रपटात ऐकायला मिळते. खरं तर आजतागायत स्वामीजींचे वाक्य मी बॉलीवूडच्या एकाही चित्रपटात ऐकले नाही. याशिवाय हा चित्रपट तरूणांना नजरेसमोर ठेवून बनविल्याचे पदोपदी जाणवते. आज त्याची नितांत गरज आहे. कारण देशाचे भवितव्य ठरवणा-या पिढीसमोरचे आदर्श कोण आहेत यावर त्यांची घडण होत असते. त्यामुळेच अक्षय कुमार, अजय देवगण, सलमान खान, आमीर खान जे आदर्श चित्रपटाच्या माध्यमातून देशासमोर ठेवत आहेत तो निश्चितच अभिनंदनीय आणि आशादायी आहे.
विशेष म्हणजे अक्षय कुमारने 'गब्बर'ची पहिल्या दिवसाची संपूर्ण कमाई नेपाळच्या भूंकप पिडीतांना देण्याचे ठरविले होते. त्यामुळे अक्षयच्या सामाजिक प्रगल्भतेला सलामच ठोकला पाहिजे. आपण वेळात वेळ काढून भ्रष्टाचारचे सप्तरंग दाखवणारा आणि भ्रष्टाचा-यांचा कर्दनकाळ ठरणा-या अक्षयच्या 'गब्बर'ला पाहण्यासाठी आपल्या कुटुंबासह आवर्जून जा, ही विनंती..!


सागर सुरवसे
९७६९१७९८२३ / ९६६५८९९८२३
Follow on Twitter : @sagarsuravase

0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!