Tuesday 31 March 2015


विधानसभा  निवडणुकीपूर्वी सत्तारूपी वराशी विवाह होण्यापूर्वीच भाजप-शिवसेना या वधूंनी काडीमोड घेतला. खरंतर विवाह झालाच नव्हता पण तो निश्‍चित होता. प्रश्‍न केवळ एवढाच होता की, पट्टराणी कोण होणार? सेना की भाजप? जनतेने दिलेल्या कौलानुसार कमळाबाई पट्टराणी झाली आणि तिने संसार थाटला. हा संसार चालवण्यासाठी तिला सेनाताईची गरज होतीच. त्यानुसार कमळाबाईने आपला विवाह मोठ्या थाटामाटात, कोट्यवधी रूपये खर्चून केला. सेनाताईदेखील आपल्या रूपगर्वितेमुळे आडून राहिली. त्यानंतर कमळाबाईने आपली चाल खेळत सेनाताईला आपली सवत बनविले. 

या सत्तारूपी विवाहाला जेमतेम चार महिनेही पूर्ण झालेले नसताना  या सवती एकमेकांना टोमणा मारण्याची एकही संधी सोडताना पहायला मिळत नाहीत. संधी मिळेल तिथे, मिळेल तेव्हा या सवती एकमेकींचा पानउतारा करू लागल्या. राष्ट्रवादी सासरे मात्र हा सारा खेळ दुरून पाहून गालातल्या गालात हसत आहेत. मुळात या कानपिचक्या, हा पानउतारा, हे टोमणे मारण्याचे कारण म्हणजे मुंबई महापालिकेची जहागिरी कोणाकडे राखायची यासाठी आहे.

राज्यातील जनतेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या भ्रष्ट सरकारला कंटाळून शिवसेना-भाजपच्या पारड्यात मते टाकली. प्रचंड अपेक्षा असलेल्या या युतीतील नेत्यांनी राणाभीमदेवी थाटात अनेक आश्‍वासनं दिली. मात्र सत्तेवर येताच ही आश्‍वासने हवेत विरल्याचं पहायला मिळत आहे. सत्तेच्या धुंदीत आणि मग्रूरीत आजचे सत्ताधारी मश्गुल झालेत. याचाच परिपाक म्हणून हे राज्यकर्ते आपल्याच सरकारमधील मित्रांचा वाट्टेल त्या शब्दात पानउतारा करताना पहायला मिळत आहेत. गेल्या चार महिन्यातील राज्यकारभार करतानाची सेना-भाजपतील वाचाळवीरांची विधाने पाहून नक्की हे सत्तेत आहेत की, विरोधी पक्षातील आहे हा प्रश्‍न तमाम महाराष्ट्रवासीयांना पडतो आहे.


विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपने कॉंग्रेसच्या शिवाजीराव देशमुखांना पायउतार करण्यासाठी राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे साहजिकच शिवसेनेचा तीळपापड झाला. या रागातून सेनेनं शिवाजीराव देशमुखांवरील अविश्‍वासाच्या ठरवाला महाभारत असं संबोधलं. तसंच यामध्ये भाजपला दुर्योधन अशी उपाधी दिल्यानं पांडवांचे समर्थक असलेल्या भाजपला हा अपमान सहनच झाला नाही. याशिवाय सेनेनं त्याचं विश्‍लेषण करताना, या अविश्‍वासाच्या ठरावात भाजपने महाराष्ट्राचं वस्त्रहरण केल्याचा आरोपही केला. सरकार शिवसेना-भाजपचं असलं तरी भाजप-राष्ट्रवादी यांचं शुभमंगल आंतरपाटाशिवाय लागल्याची टीकाही सेनेनं केली. या विधानामुळे शिवसेना नक्की सत्तेत आहे की विरोधीपक्षात हे कळण्यास मार्ग नाही.

मागील महिन्यात शिवसेनेच्या मंत्र्यांना पूर्ण अधिकार दिले जात नसल्याचा आरोप सेनेच्या मंत्र्यांनी केला होता. महसूलमंत्री एकनाथ ख़डसे मनमानी कारभार करत आहेत. ते शिवसेनेच्या मंत्र्यांना कामकाज करू देत नसल्याचाही आरोप केला होता. त्यामुळे ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. त्याला सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनीही दुजोरा दिला होता. एकनाथ खडसे यांनी आपल्याकडील 80 टक्के कामकाज काढून घेतले असल्याचं राठोड यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी मांडले. तसंच खडसेंना अँटी करप्शनच्या फायली हव्यातच कशाला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा की, खडसेंना केवळ अँटी करप्शनच्याच फायली हव्या आहेत. कारण त्या फायली दाबून पक्षनिधी उकळता येतो. मात्र यावेळी दुसरा प्रश्‍नही उपस्थित होतो की, शिवसेनेला तरी यात रस का असावा? त्यामुळे हे सरकार पारदर्शी आहे असे उभय पक्षातील नेत्यांनी म्हणणे फारसे नैतिकतेला धरून राहत नाही.

यापूर्वीही शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी अनेक दिग्गज नेते सरकारमध्ये होते. असे असतानाही पाच वर्षात युती सरकारला जनतेने घरी बसवले. ते तब्बल पंधरा वर्षांसाठी. खरंतर संघाच्या शाखेतील बौद्धिक वर्गात अनेक दिग्गज प्रचारकांचे बौद्धिक ऐकलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांना मागील सरकारला घरी का बसावे लागले याचा बोध घेणे अवघड नाही. 


शिवसेना आपल्या स्टाईलने ’सामना’तून आपली भूमिका मांडत असते. सातत्याने स्वाभिमानाची भाषा करणारी शिवसेना मात्र, ‘मी नाही त्यातली; कडी लावा आतली’, अशीच भूमिका घेताना दिसते. सत्तेत राहण्याची प्रचंड महत्त्वाकांक्षा असताना केवळ फुकाचा दम टाकण्याची नवी परंपरा शिवसेना पक्षप्रमुखांनी सुरू केली आहे. 


गेल्या चार महिन्यात सरकार सत्तेत आले असले तरी प्रत्यक्षात मात्र सत्तेत त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. केवळ एकमेकांची खेचाखेची करणे एवढेच काय ते सत्ताधार्‍यांचे काम उरले आहे. सेना-भाजपच्या या कलगीतुर्‍यात मात्र विरोधक सोयीस्कर भूमिका घेताना दिसत आहेत. आजच्या घडीला राज्यात अनेक समस्या आहेत. मात्र सरकार यावर कोणताही प्रभाव पाडू शकलेली नाही. मुख्यमंत्री अठरा अठरा तास काम करून ट्वीटरवरून आपण अमूक अमूक विभागाच्या सर्व फाईल्स क्लिअर केल्या आहेत, झिरो पेंडन्सी केली असल्याचं ते ट्वीट करून सांगतात. महाराष्ट्रातील जनतेला वाटले होते की, ’देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ या घोषणेप्रमाणे देवेंद्र महाराष्ट्राचा गुजरात करतील, मात्र लोकांची ही अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. मोदी खर्‍याअर्थी मुख्यमंत्री होते. त्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळावर वचक होता. फडणवीस मात्र आपली कातडीबचाव भूमिका घेत, आपण कसे अठरा-अठरा तास काम करतो याचा डांगोरा आपल्या पत्रकारमित्रांकडे पिटताना दिसतात. आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळवीरांकडे मात्र ते सोयीस्कर दुर्लक्ष करतात. 


उद्धव ठाकरे यांचे लक्ष केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडेच आहे. विधानसभेपूर्वी त्यांनी जाहीर केलेल्या शिवआरोग्य योजना, दूरशिक्षण योजनेबाबत मात्र कसलीही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या विकासाबाबतच्या दृष्टीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
अखेर युतीतील ही धुसफुस पाहता काही वरिष्ट नेत्यांना युतीमध्ये समन्वय समिती स्थापन करण्याची वेळ आली आहे. एकाअर्थी सेना-भाजप युतीचे हे अपयश आहे. ही परिस्थिती जर का अशीच राहिली तर मात्र भविष्यात हे सरकार पुन्हा सत्तेवर येण्याचं सोडा, विरोधी बाकावर तरी बसण्यास लायक ठरेल का, हे सांगणं कठीण आहे. मात्र आजच्या घडीला, ’नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे’ या म्हणीप्रमाणे युतीतील नेत्यांची वाटचाल असल्याचं पहायला मिळत आहे.


(लेखाची पूर्व प्रसिद्धी- 'साहित्य चपराक' मासिक, पुणे - एप्रिल २०१५ )

सागर सुरवसे,


९७६९ १७९ ८२३ /  ९६६५ ८९९ ८२३

Follow On Twitter: @sagarsuravase






0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!